
सामना प्रतिनिधी । माहूर
महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावरील श्री रेणूकादेवीच्या नवरात्र उत्सवास बुधवारपासून सुरुवात होत आहे. श्री रेणूकामातेला नऊ दिवस वेगवेगळ्या रंगाच्या पैठणी महावस्त्र नेसविण्यात येणार आहे, अशी माहिती श्री रेणुकादेवी संस्थानचे विश्वस्त चंद्रकांत भोपी व विश्वस्त संजय कान्नव यांनी दिली. श्री रेणुकादेवीचा नवरात्र उत्सव भाविकांसाठी पर्वणीच असतो. दहा दिवस सह्याद्रीच्या डोंगर रांगात आई भवानी श्री रेणुकादेवीचा गजर ऐकावयास मिळतो. जिकडे-तिकडे भक्तीमय वातावरण पहावयास मिळते. नवरात्र उत्सवाची श्री रेणुकादेवी संस्थान विश्वस्त समितीने जय्यत तयारी केली आहे.
भाविकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सुलभ दर्शनासह आलेल्या प्रत्येक भाविकांसाठी महाप्रसाद व फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे. नवरात्र उत्सवात देवीला प्रतिपदा/द्वितीया घटस्थापनेला-पिवळ्या रंगाची पैठणी, तृतीया-हिरवी पैठणी, चतुर्थी -करडा पैठणी, पंचमी -नारंगी पैठणी, पंचमी- पांढरी पैठणी, षष्टी -लाल पैठणी, सप्तमी/ अष्टमी -निळी पैठणी, अष्टमी/ नवमी -गुलाबी पैठणी, नवमी/ दशमी -जाभंळी पैठणी महावस्त्र देवीला नेसविव्यात येणार आहे. या पैठणी येवला येथून दिड लाख रुपये खर्च करून संस्थानने खरेदी केल्या आहेत. त्यामुळे दररोज भाविकांना देवीची वेगवेगळी महावस्त्रे पहावयास मिळणार आहेत.
































































