विशेष पोलीस अधिकाऱ्यांच्या हत्येमागे पाकड्यांचा हात; हिंदुस्थानकडे पुरावे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

शोपियाँ जिल्ह्यात तीन विशेष पोलीस अधिकाऱ्यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयचा मेसेज इंटरसेप्ट करून हिंदुस्थानी सुरक्षा यंत्रणांनी ही माहिती मिळवली आहे. कश्मीरमधील दहशतवाद्यांना आयएसआयने या पोलीस अधिकाऱ्यांची हत्या करण्याचे निर्देश दिले असल्याचे उघड झाले आहे. विशेष पोलीस अधिकाऱ्यांच्या हत्येमागे पाकड्यांचा हात असल्याचे उघड झाल्यानंतर हिंदुस्थानकडून पुढील आठवड्यात न्यूयॉर्कमध्ये दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची होणीर भेट रद्द करण्यात आली होती.

सीमेपलीकडून आलेले मेसेज हिंदुस्थानी सुरक्षा यंत्रणांनी मोठ्या शिताफीने मिळवले आहेत. अपहरण केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची हत्या करण्याचे स्पष्ट निर्देश आयएसआयने दिले होते. त्या संदेशात या पोलीस अधिकाऱ्यांचा नावासह उल्लेख करण्यात आला होता. त्यावरून पाकड्यांचा हा कट पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट होत आहे. सीमेपलीकडून अपहरण केलेल्या तीन पोलीस अधिकाऱ्यांची हत्या करण्याचे तसेच अपहरण केलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या भावाला सोडण्याचे निर्देशही देण्यात आले होते. हे मेसेज इतक्या जलदगतीने येत होते की सुरक्षा यंत्रणांना दहशतवाद्यांचे मनसुबे उधळण्याची संधीच मिळाली नाही. सीमेपलीकड़ून आलेल्या संदेशानुसार दहशतवाद्यांनी तीन पोलीसांची हत्या केली. तर विशेष पोलीस अधिकाऱ्याचा अपहरण केलेला भाऊ फय्याज अहमद भट याला सोडण्यात आले होते.

पाकिस्तानकडून आलेल्या या मेसेजची हिंदुस्थानने गंभीर दखल घेत पाकिस्तानबरोबरची प्रसतावीत चर्चा रद्द केली आहे. जम्मू कश्मीरमध्ये होणाऱ्या स्थानिक निवडणुकांवर परिणाम करण्यासाठी दहशतवाद्यांनी सीमेपलीकडून आलेल्या संदेशानुसार या हत्या केल्या आहे. स्थानिक नागरिकांसह पोलीस दल आणि सुरक्षा यंत्रणामध्ये दहशत निर्माण करण्याचाही या घटनेचा उद्देश होता. स्थानिक निवडणुकांवर परिणाम करण्यासाठी आणि दहशत निर्माण करण्यासाठी दहशतवादी सक्रीय असल्याची माहिती गृहविभागाला मिळाली होती. आता दहशतवादी वर्दी आणि शस्त्राशिवाय असलेल्या विशेष पोलीस अधिकाऱ्यांना लक्ष्य करत आहे. त्यामुळे पोलिसांनीही सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.