नवाज शरीफ अखेर उपचारासाठी लंडनला जाणार

568

पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) पक्षाचे प्रमुख आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ लाहोरमध्येच इलाज करून घेण्यावर ठाम होते. मात्र अखेर परदेशात उपचार करून घेण्यास ते तयार झाले आहेत. सोमवारी ते लंडनला जाणार असून 27 नोव्हेंबरला पुन्हा मायदेशी परतणार आहेत. शरीफ यांना अल-अजीजिया स्टील मिल्स घोटाळ्याप्रकरणी सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांच्या बिघडत्या प्रकृतीमुळे इम्रान खान सरकारने त्यांना परदेशी जाण्याची परवानगी दिली असली तरी त्यांचे नाव ‘नो फ्लाय’ लिस्टमधून काढण्यात आलेले नाही.

पंतप्रधान इम्रान खान यांचे विशेष सहाय्यक नईम-उल-हक यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, स्वतःवर इलाज करवून घेण्याचा अधिकार प्रत्येक पाकिस्तानी व्यक्तीचा आहे. त्यासाठीच कैदेत शिक्षा भोगत असलेल्या नवाज शरीफ यांच्यावर गेले दोन आठवडे सर्व्हिस हॉस्पिटलमध्ये इलाज सुरू होता. त्यानंतर त्यांच्या घरीच आयसीयूची व्यवस्था करण्यात आली, मात्र त्यांची प्रकृती बिघडतच चालली आहे. त्यांच्या प्लेटलेटस् 2000 पर्यंत खाली आल्या आहेत. त्यामुळे 69 वर्षीय शरीफ यांना 22 ऑक्टोबरला पुन्हा सर्व्हिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

धाकट्या भावासोबत परदेशी जाणार

माजी पंतप्रधान नवाज शरीफ आपला धाकटा भाऊ आणि पीएमएल-एन पक्षाचे अध्यक्ष शाहबाज शरीफ यांच्यासोबत सोमवारी लंडनला रवाना होणार आहेत. गेल्याच आठवडय़ात नवाज शरीफ यांना येथील उच्च न्यायालयाने उपचारासाठी आठ आठवडय़ांचा जामीन मंजूर केला आहे. त्याआधी लाहोर उच्च न्यायालयानेही चौधरी शुगर मिलप्रकरणी त्यांना जामीन दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या