पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, हिंदुस्थानचा एक जवान शहीद

193

जम्मूकश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम रद्द केल्यापासून बिथरलेल्या पाकडय़ांकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे. हिंदुस्थानी जवानांकडून पाकडय़ांच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले जात असून आज पाकिस्तानच्या दोन लष्करी अधिकार्‍यांसह पाच जवानांचा खात्मा करण्यात आला. एवढेच नव्हे तर पाकडय़ांच्या तीन चौक्याही उद्ध्वस्त झाल्या. दरम्यान, नौशेरा सेक्टरमध्ये पाकच्या गोळीबारात जवान लान्सनायक संदीप थापा हे शहीद झाले.

370 कलम 5 ऑगस्टला हटविले. 6 ऑगस्टपासून पाकडय़ांकडून गोळीबार सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी हिंदुस्थानी जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर देताना पाकच्या चार सैनिकांचा खात्मा केला होता. शनिवारी सकाळी 6.30 पासून पूंछ आणि राजौरी सीमेवर पाकडय़ांनी गोळीबाराला सुरुवात केली. हिंदुस्थानी लष्कर आणि बीएसएफच्या जवानांकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. रात्री उशिरापर्यंत धुमश्चक्री सुरू होती.

सीमेवर हाय अलर्ट

पाकिस्तानी सैन्याकडून वारंवार सीमेवर गोळीबार सुरू आहे. तसेच कश्मीर खोर्‍यात दहशतवादी हल्ल्याची भीती आहे. यामुळे लष्कराला आणि सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

 पाकडय़ांची खुमखुमी कायम

जम्मूकश्मीरातील 370 कलम रद्द केल्यामुळे थयथयाट करणारा पाकिस्तान हिंदुस्थानविरोधात गरळ ओकण्याची एकही संधी सोडायला तयार नाहीय. आता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने फटकावल्यावरही पाकिस्तानी लष्कराने आम्ही हिंदुस्थानने निर्माण केलेल्या कोणत्याही आव्हानाला तोंड द्यायला सज्ज आहोत अशी कोल्हेकुई हिंदुस्थानविरोधात सुरू केली आहे.पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांच्या उपस्थितीत लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ही बकबक केली.

आपली प्रतिक्रिया द्या