पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, लष्कराने तळ उद्ध्वस्त करून घडवली अद्दल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकिकडे सगळं जग कोरोनाच्या विळख्यात अडकलं आहे. जगभरात एक लाखांहून अधिक बळी गेले असून अनेक देश कोरोनाच्या दहशतीत आहेत. हिंदुस्थानप्रमाणेच पाकिस्तानवरही कोरोनाचं सावट आहे. पण, पाकिस्तानने मात्र त्याच्या कुरापती सुरूच ठेवल्या आहेत.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानकडून शुक्रवारी जम्मू-कश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा फायदा घेत हिंदुस्थानी सीमेत घुसखोरी करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. वारंवार गोळीबार करून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत होतं. शुक्रवारीही पाकड्यांनी कुपवाडा जिल्ह्यात असाच गोळीबार केला. मात्र, पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबाराला हिंदुस्थानने चोख प्रत्युत्तर दिलं.

हिंदुस्थानच्या सैन्याने सीमेच्या पलिकडे जोरदार हल्ले केले. कुपवाडा येथे सीमारेषेपलिकडे दहशतवाद्यांचे लाँच पॅड आणि दारुगोळ्याचं ठिकाण होतं. मात्र, या हल्ल्यानंतर ते उद्ध्वस्त झालं आहे. हिंदुस्थानी सैन्याने शक्तिशाली शस्त्रांचा वापर करून हे तळ उद्ध्वस्त केले. विशेष म्हणजे या हल्ल्याचं चित्रीकरणही करण्यात आलं. ड्रोनच्या साहाय्याने हे चित्रीकरण करण्यात आलं असून हा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.