तीन राफेल विमाने पाडली; खरे काय? अमेरिकेची शंका तर पाकिस्तानचा दावा; हिंदुस्थानचे मौनच

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कश्मीरचा मुद्दा पेटवल्यानंतर आता अमेरिकेच्या अधिकाऱयांनी पाकिस्तानने चीनच्या जे-10 सी या लढाऊ विमानांचा वापर करून हिंदुस्थानची तीन राफेल विमाने पाडल्याची शक्यता व्यक्त केली आहे. यावर हिंदुस्थानी लष्कराने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले असून नेमके खरे काय? पाकिस्तनच्या दाव्यात कितपत सत्यता आहे, असे सवाल प्रसारमाध्यमांमध्ये केले जात आहेत.

अमेरिकेच्या अधिकाऱयांनी रॉयटर्सशी बोलताना याबाबतची शक्यता व्यक्त केली, तर दुसरीकडे द टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार चिनी बनावटीच्या पीएल-15 क्षेपणास्त्राचा वापर हिंदुस्थानी लष्कराची राफेल विमाने पाडण्यासाठी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या क्षेपणास्त्रांचा पहिल्यांदा वापर केला गेला. वैमानिकाची नजर जाणार नाही तितक्या दूरपर्यंत लक्ष्यभेद करण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता असल्याचे म्हटले जात आहे. पीएल-15 क्षेपणास्त्रे चीनने पाकिस्तानला दिली होती. ही क्षेपणास्त्रे 145 किलोमीटरपर्यंत हवेतून हवेत मारा करू शकतात.

राफेल बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स घसरले, चिनी कंपन्यांची चांदी

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी संसदेत दावा केला की पाकिस्तानच्या 10 सी विमानांनी हिंदुस्थानची तीन राफेल विमाने पाडली. त्यानंतर राफेल बनवणाऱया द सॉ एव्हिएशनचे शेअर्स चांगलेच गडगडले तर चिनी कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती वधारल्या. दरम्यान, फ्रान्सच्या गुप्तचर विभागातील सूत्रांनी सीएनएनला दिलेल्या माहितीनुसार कमीत कमी एक राफेल विमान पाकिस्तानने पाडले. कुठल्याही युद्धात राफेलचे पहिल्यांदाच अशाप्रकारे नुकसान झालेले आहे.