हॉकीनंतर पाकिस्तानात क्रिकेटलाही उतरती कळा!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानला 0-2 फरकाने पराभवाची नामुष्की पत्करावी लागल्यानंतर माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) खडे बोल सुनावले. पाकिस्तानात हॉकी, चित्रपटसृष्टीनंतर आता क्रिकेटलाही उतरती कळा लागल्याची हताश प्रतिक्रिया त्याने दिली.

शोएब अख्तर आपल्या यू टय़ूब चॅनेलवरून पाकिस्तानी क्रिकेटपटू ‘पीसीबी’वर चांगलाच बरसला. तो म्हणाला, खेळात हार-जीत असते. त्यामुळे पाकिस्तानने कसोटी मालिका गमावली याचे दुःख नाही, पण पाकिस्तानी क्रिकेटच्या भविष्याबद्दल नक्कीच चिंता आहे. पाकिस्तानात हॉकी, स्क्वॉश, चित्रपट, टेलिव्हिजन हे संपताना मी पाहिले आहे. दुर्दैवाने आता क्रिकेटलाही आपल्या देशात संपताना पाहण्याची वेळ आमच्यावर आली आहे. पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या निवडीत पक्षपात केला जातो. ‘पीसीबी’ आपल्या मर्जीतील क्रिकेटपटूंची संघात निवड करते. इम्रान खानने पाकिस्तानी क्रिकेट संघाला घडवले. त्यानंतर निवड समितीवर चांगले लोकं आले. त्यामुळेच वसीम अक्रम, मुश्ताक अहमद, सक्लेन मुश्ताख, वकार युनिससारखे प्रतिभावान खेळाडू पाकिस्तानला मिळाले. संघाची निवड पारदर्शक पद्धतीने होत नाही तोपर्यंत पाकिस्तान क्रिकेटमध्ये जिंकू शकत नाही, असे परखड मतही शोएब अख्तरने व्यक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या