
हिंदुस्थानच्या हद्दीत घिरटय़ा घालणारा पाकिस्तानचा ड्रोन दिसताक्षणीच त्याच्या चिंधड्या उडवा, असा स्पष्ट आदेश केंद्र सरकारने सर्व सुरक्षा यंत्रणांना दिला आहे. पाकिस्तानचे दहशतवादी कारनामे वेळच्या वेळी ठेचून काढण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली आहेत. त्याच अनुषंगाने सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हिंदुस्थानात घुसलेल्या दहशतवाद्यांना चीनमध्ये बनवलेल्या ड्रोनच्या मदतीने शस्त्रे पुरवण्याचा नवा अतिरेकी प्रयत्न पाकिस्तानने सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वीच अशाच ड्रोनचा वापर करून पंजाबच्या काही भागांत शस्त्रे आणि ड्रग्ज पुरवले गेल्याचे उघडकीस आले आहे. पाकड्यांचे हे दहशतवादी मनसुबे उधळून लावण्यासाठी केंद्र सरकारने सर्व सुरक्षा यंत्रणांना डोळ्यांत तेल घालून सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच 1000 फूट किंवा त्याहून कमी उंचीवरून उडणाऱया पाकिस्तानी ड्रोनच्या तिथल्या तिथे चिंधड्या उडवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
370 हटवल्यापासूनच पाठवले जाताहेत ड्रोन्स!
मोदी सरकारने जम्मू-कश्मीरमधून कलम 370 हटवल्यापासूनच पाकिस्तान ड्रोन्सच्या मदतीने हिंदुस्थानात शस्त्रे पाठवत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पंजाबमध्ये जप्त केलेल्या ड्रोन्सची ‘आयएसआय’सारख्या दहशतवादी संघटनेशी असलेली लिंक उघड झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा प्रत्येक कट उधळण्याचा निर्धार सरकारने केला आहे.






















































