हिंदुस्थान चंद्रावर पोहोचला, आम्ही अजून पैसेच मागतोय…

पाकिस्तान सध्या आर्थिक टंचाईत सापडला असून, वर्षभरापासून महागाई गगनाला भिडली आहे. यादरम्यान पाकमध्ये काळजीवाहू पंतप्रधान नेमण्यात आले असून, राजकीय अस्थिरता निर्माण झाली. हिंदुस्थानच्या प्रगतीवर त्यांनी भाष्य केले. हिंदुस्थान चंद्रावर पोहोचला, आम्ही अजून इतर राष्ट्रांकडे नेहमी पैसेच मागतोय… त्यामुळे ही परिस्थिती बदलली पाहिजे, अशी भावना शरीफ यांनी व्यक्त केली.

हिंदुस्थानकडे ६०० अब्ज डॉलर्सचा खजिना आहे. त्याचवेळी पाकिस्तान चीन आणि अरब देशांसह जगभरातून १- १ अब्ज डॉलर्सची मागणी करत आहे. अशा स्थितीत त्यांच्यासमोर आपली काय इज्जत राहिली? आपण कंगाल होण्याच्या मार्गावर आहोत, असे नवाज शरीफ यांनी म्हटले आहे. ज्यांनी पाकिस्तानची ही अवस्था केली, ते देशाचे सर्वात मोठे गुन्हेगार आहेत. पीडीएम सरकारने देशाला डिफॉल्ट होण्यापासून वाचवले आहे, अन्यथा देशा पेट्रोलची किंमत १००० रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचली असती. नवाज शरीफ यांनी देशाच्या स्थितीसाठी निवृत्त लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा, माजी आयएसआय प्रमुख फैज हमीद आणि माजी सरन्यायाधीश मियाँ साकिब निसार यांना या सर्वासाठी जबाबदार धरले. माझ्या राजवटीत देशाची प्रगती होत होती. असे असतानाही मला कोर्टात २७ वर्षांची शिक्षा झाली. मला वर्षानुवर्षे देशाबाहेर राहावे लागले. या सगळ्यामागे जनरल बाजवा आणि जनरल फैज यांचा हात होता.