
पाकिस्तानने चीनच्या मदतीने एक रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट प्रक्षेपित केला. चीनमधील शिचांग उपग्रह प्रक्षेपण केंद्रावरून हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी ही माहिती दिली. उपग्रहाच्या मदतीने अनेक क्षेत्रांची हाय रिझोल्युशन इमेज अवघ्या 24 तासांत मिळतील, तसेच हा उपग्रह चीन- पाकिस्तानच्या अनेक संयुक्त प्रकल्पांवर अंतराळातून लक्ष ठेवेल, असा दावा पाकिस्तानने आज केला.
पाकिस्तानच्या अंतराळ आणि उच्च वातावरण संशोधन आयोगाने चीनच्या सीईटीसी आणि मायक्रोसॅट सोबत मिळून हा उपग्रह लाँच केला. चीन-पाकिस्तानच्या इकोनॉमिक कॉरिडोरवर हा प्रकल्प नजर ठेवेल, असे पाकिस्तानी प्रवक्त्यांनी सांगितले. याशिवाय, पर्यावरणीय समस्यांचे विश्लेषण करण्यास देखील मदत होईल. धोरणात्मक महत्त्वाच्या गोष्टींवर देखील लक्ष ठेवता येईल आणि नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन देखील करता येईल’, असे पाकिस्तानी एजन्सीचे म्हणणे आहे.
हा पाकिस्तानचा दुसरा रिमोट-कंट्रोल्ड उपग्रह आहे. यापूर्वी पीआरएएस-1 1 लाँच केला होता. तो 2018 मध्ये लाँच करण्यात आला होता. या नवीन उपग्रहामुळे पाकिस्तानचे एकूण 5 उपग्रह अंतराळ कक्षेत सक्रिय झाले आहेत.