हिंदुस्थान चंद्रावर पोहोचला अन् कराचीतील मुले गटारात पडून मरताहेत !

हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन देशात सर्वच गोष्टीवर तुलना केली जाते. पाकिस्तानचे खासदार सय्यद मुस्तफा कमाल यांनी नॅशनल असेंब्लीमध्ये हिंद्स्थानच्या शिक्षण व्यवस्थेची पाकिस्तानच्या शिक्षण व्यवस्थेशी तुलना केली. शेजारी देश हिंदुस्थान चंद्रावर पोहोचला आहे. तर दुसरीकडे कराचीतील मुले गटारात पडून मरत आहेत, असे सय्यद कमाल यांनी म्हटले आहे. 30 वर्षांपूर्वी, आपल्या शेजारी हिंदुस्थानने आपल्या मुलांना जगभर मागणी असलेल्या गोष्टी शिकवल्या. आज टॉप 25 पंपन्यांमधील सीईओ हे हिंदुस्थानी आहेत. आज जर हिंदुस्थानी प्रगती करत असेल, तर त्याचे कारण म्हणजे तिथे जे आवश्यक होते ते शिकवले गेले. आज पाकिस्तानची आयटी निर्यात 7 अब्ज डॉलर्स आहे, तर हिंदुस्थानची आयटी निर्यात 270 अब्ज डॉलर्स आहे. दोन देशामधील इतका मोठा फरक आहे. सध्या पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे, गेल्या एका वर्षात त्यांनी आयएमएफकडून तीनदा कर्ज घेतले आहे. 30 एप्रिल रोजी आयएमएफकडून 9.183 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळाल्यानंतर, मे महिन्यात पाकिस्तानचा परकीय चलन साठा 1.20 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.