पाकिस्तानची जनता महागाईत होरपळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कश्मीरच्या मुद्द्यावरून हिंदुस्थानविरोधात आगपाखड करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे स्वतŠच्या देशातील समस्या सोडवण्यात सपशेल अपयशी ठरल्याचे उघडकीस आले आहे. गॅलप इंटरनॅशनल या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून देशातील जनतेपुढील विविध समस्या चव्हाटय़ावर आल्या. येथील जनता महागाईने होरपळली असून बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि पाणीटंचाई असे अनेक प्रश्न चिंतेचे विषय बनले आहेत.

एकीकडे इम्रान खान जगापुढे कश्मीरबाबत पुळका दाखवत आहेत. मात्र पाकिस्तानातील विविध समस्यांकडे ते दुर्लक्ष करीत असल्याचे गॅलप इंटरनॅशनलच्या सर्वेक्षणावरून स्पष्ट झाले आहे. या संस्थेने पाकिस्तानच्या चारही प्रांतांमध्ये सर्वेक्षण केले. या वेळी देशाची अर्थव्यवस्था ढासळण्यास सरकारचेच अपयश कारणीभूत असल्याचा दावा नागरिकांनी केला. देशातील 53 टक्के नागरिकांनी महागाई हा मोठा चिंतेचा विषय असल्याचे मत मांडले. त्यापाठोपाठ 23 टक्के नागरिकांनी बेरोजगारी ही एक समस्या गंभीर असल्याचे सांगितले. कश्मीरच्या मुद्दय़ावर केवळ 8 टक्के लोकांनी चिंता व्यक्त केली. भ्रष्टाचार आणि पाणीटंचाई हे प्रश्नसुद्धा देशात गंभीर रूप धारण करीत असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले.