
पहलगाम येथे एप्रिल महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले करून पाकिस्तानला धडा शिकवला होता. त्यावेळी हिंदुस्थानने केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या वायुसेनेच्या तळांचेही नुकसान झाले होते. त्यावर प्रथमच पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी कबुली दिली आहे. आम्ही बंकरमध्ये लपण्याच्या तयारीत होतो, असे झरदारी म्हणाले.
पाकिस्तानच्या लष्करी सचिवांनी मला बंकरमध्ये लपण्याचा सल्ला दिला होता, मात्र तो मी नाकारला होता, असे त्यांनी पुढे सांगितले.झरदारी यांची युद्धाची खुमखुमी कायम आहे. पाकिस्तानला युद्ध नकोय, पण आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. पाकिस्तानला स्वतःचे रक्षण करता येते हे मोदींना कळले आहे, असे झरदारी म्हणाले.
11 हवाई तळ उद्ध्वस्त
पाकिस्तानचेच उपपंतप्रधान इशाक दार यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले होते याची कबुली दिली आहे. वर्षाच्या शेवटच्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, रावळपिंडीजवळच्या नूरखान हवाई तळावर हिंदुस्थानने 80 ड्रोनने हल्ला केला होता. त्यापैकी 79 ड्रोन पाडले, मात्र एक ड्रोन तळावर पोहोचला, असे दार म्हणाले. 6-7 मेच्या रात्री आम्ही प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत असतानाच हिंदुस्थानने पुन्हा हल्ला केला. या हल्ल्यात 11 हवाई तळांचे नुकसान झाले, असे दार म्हणाले.





























































