पाकिस्तान दहशतवादी संघटनांना आळा घालण्यात अपयशी, अमेरिकेचा अहवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘लश्कर-ए-तोयबा’ आणि ‘जैश-ए- मोहम्मद’ यासारख्या दहशतवादी संघटनांमध्ये होत असलेली भरती आणि त्यांना होणारी आर्थिक मदत रोखण्यात पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारला अपयश आले आहे. दहशतवादी संघटनेतील काहींना पाकिस्तानी सरकारने निवडणूक लढायलाही परवानगी दिली आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे.

अमेरिकेने दहशतवादविरोधातील 2018 च्या वार्षिक अहवालात याचा खुलासा केला आहे. ‘लश्कर’, ‘जैश’ या दहशतवादी संघटना आजही मोठय़ा प्रमाणात आर्थिक निधी गोळा करत आहेत. नवीन लोकांची भरती करत आहेत, मात्र त्याविरोधात इम्रान खान सरकारने कोणतीही कठोर पावले उचलली नाहीत असे या अहवालात म्हटले आहे. ‘अल कायदा’ अजूनही सक्रिय आहे. हिंदुस्थानी लष्करी ठिकाणांवर ‘लश्कर-ए-तोयबा’ आणि ‘जैश-ए-मोहम्मद’ हल्ले करतात. या संघटनांवर पाकिस्तान कारवाई करत नाही असे या अहवालात म्हटले आहे.