
अफगाणिस्तानावर तालिबानने पुन्हा एकदा ताबा मिळवल्यानंतर त्याचे पडसाद आजूबाजूच्या देशांमधील कट्टरतावादी, धर्मांधांमध्येही पाहायला मिळत आहेत. पाकिस्तानमध्ये हिंदुस्थानच्या इतिहासातील महत्त्वाच्या व्यक्ती, पवित्र अशा प्रतिकांची मोडतोड झाल्याची उदाहरणं आहेत. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे. लाहोरमध्ये महाराजा रणजीत सिंह यांची अश्वारुढ मूर्ती पुन्हा एकदा तोडली गेली आहे. हे कृत्य तहरीक-ए-लबॅक-पाकिस्तान या संघटनेशी जोडलेल्या एका व्यक्तीनं केल्याचं कळतं आहे.
लाहोर किल्ल्यावर बसवण्यात आलेल्या या प्रतिमेचं अनावरण जून 2019 मध्ये करण्यात आलं होतं. त्यानंतर तिसऱ्यांदा ही घटना घडली आहे.
ताज्या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सफेद कुर्ता-पायजमा आणि टोपी घातलेला व्यक्ती दिसत आहे. मूर्ती तोडताना ही व्यक्ती नारे देताना देखील दिसत आहे. ही मूर्ती तोडली जात असताना काही जण तिथे आसपास उभे होते. त्यांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. तहरीक-ए-लबॅक पाकिस्तानी म्हणजेच TLP पाकिस्तानच्या एका पॉलिटिकल पक्षाशी हा व्यक्ती संबंधित असल्याचं कळत आहे. हा पक्ष धर्मांध, कट्टरतावादी भूमिकांसाठी ओळखला जातो. 2015 मध्ये या पक्षाची स्थापना करण्यात आली होती. याच वर्षी या पक्षावर बंदी आणण्यात आल्याचे कळते.
हिंदुस्थानात अत्यंत मानाचे स्थान असलेले महाराज रणजीत सिंह यांचं निधन 1839 मध्ये झाले होते. त्यावेळी लाहोर हिंदुस्थानचा भाग होता. त्यांच्या स्मृतीत ही मूर्ती लाहोर किल्ल्यात बसवण्यात आली. जून 2019 मध्ये त्याचं अनावरण करण्यात आलं होतं.




























































