
पहलगाम हल्ल्याच्या आठ दिवसांनंतर आज पाकिस्तानी सैन्याने आंतरराष्ट्रीय सीमेवरील अनेक चौक्या रिकामी केल्या. या चौक्यांवरील ध्वजही काढून टाकण्यात आले आहेत. हिंदुस्थानच्या कठोर भूमिकेनंतर पाकिस्तानची टरकल्याचे दिसत आहे. कठुआच्या पर्गल भागात या पोस्टस् होत्या त्या आता रिक्त करण्यात आल्या आहेत.
पाकिस्तानी सैन्य सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. मात्र, आज पहिल्यांदाच पाकिस्तानी सैन्याने आंतरराष्ट्रीय सीमेवर युद्धबंदीचे उल्लंघन केले. मात्र, त्यांच्या हल्ल्यांना हिंदुस्थानी लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले.
दुसरीकडे पहलगाम हल्ल्याचा तपास करणाऱया एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेला बैसरन खोऱयात 40 काडतुसे सापडली. फॉरेन्सिक टीमचे दोन सदस्यही एनआयएसोबत तपास करत आहेत. हे सदस्य स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफच्या मदतीने घनदाट जंगलात पुरावे गोळा करत आहेत. दरम्यान, मंगळवारी रात्री उशिरा 10 ते 12 राऊंड गोळय़ा झाडण्यात आल्या. आम्हाला आता या गोळीबाराची सवय झाली आहे, अशी प्रतिक्रिया अखनूरच्या पर्गवाल भागातील रहिवाशांनी दिली.