
पाकिस्तानात महागाईचा विस्फोट झाला असून थंडिच्या दिवसात देखील भाज्यांच्या दरांनी आकाश गाठले आहे. इस्लामाबादमधील बाजारात आलं हे तब्बल एक हजार रुपये किलोने विकले जातेय तर भाज्यांचे दर देखील दोनशे रुपये किलोच्या जवळ पोहोचले आहेत.
पंतप्रधान इमरान खान यांची पूर्वाश्रमीची पत्नी रेहम खान हिने सोशल मीडियावर बातमीचा एका व्हिडीओ पोस्ट केला असून त्यातून ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे साखरेचे भाव कमी केले म्हणून गाजावाजा करणाऱ्या इमरान खान यांची पोलखोल झाली आहे.
दोन दिवस आधीच इमरान खान यांनी ट्विट करत देशातील साखरेचे दर 81 रुपये किलोपर्यंत कमी केल्याचे सांगत स्वत:चीच स्तुती केली होती. त्याआधी पाकिस्तानात साखर 102 रुपये किलोने विकली जात होती.
गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानात खाद्यान्नाच्या किंमती दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. जो पाकिस्तान जगाला कांदा निर्यात करतो त्याला स्वत:च्याच देशात कांद्याच्या किमतीवर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाहीए. तसंच पाकिस्तानात गेल्या काही दिवसांपासून गव्हाच्या पिठाच्या किमतीत देखील मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे.
गव्हाच्या किमतीत रेकॉर्डब्रेक वाढ
पाकिस्तानात गव्हाच्या किमतीने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. सध्या तिथे गहू तब्बल 80 रुपये किलो मध्ये मिळत आहेत. गेल्या महिन्यात याच किमतींवरून देशभरात हाहाकार माजला होता.



























































