
जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबण्याचे नावचं घेत नाही आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. गेल्या नऊ दिवसांपासून पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. पाकिस्तानी सैन्याने कुपवाडा, उरी आणि अखनूर भागात पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. मात्र हिंदुस्थानी सैन्याने पाकिस्तानचा हा डाव हाणून पाडून पाकड्यांना चोख प्रत्युत्तर दिले.
गेल्या महिन्यात 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला असताना ही घटना घडली आहे. दरम्यान सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन सहन केले जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा हिंदुस्थावने पाकिस्तानला दिला होता.
पाकड्यांची तंतरली
24 एप्रिलच्या रात्रीपासून पाकिस्तानने नियंत्रण रेषेच्या विविध क्षेत्रांमध्ये गोळीबार सुरू केला, जो आतापर्यंत सुरूच आहे. यानंतर त्याच दिवशी हिंदुस्थानने पाकिस्तानविरोधात कठीण निर्णय घेत सिंधू जल करार स्थगित करण्याची घोषणा केली. याला प्रत्युत्तर म्हणून घाबरलेल्या पाकिस्तानने हिंदुस्थानी विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले. तसेत वाघा सीमा सील केली आणि हिंदुस्थानशी असलेले सर्व व्यापारी संबंध स्थगित केले. याचसोबत जर हिंदुस्थानने पाकिस्तानच्या वाट्याचे पाणी वळवण्याचा प्रयत्न केला तर ते “युद्धाचे कृत्य” मानले जाईल, अशी धमकी पाकिस्तानने दिली होती.