पाकिस्तानकडून सीमाभागात तुफान गोळीबार, लष्कराचे तीन जवान शहीद

पाकिस्तानच्या सीमाभागातील कुरघोड्या सुरुच असून गुरुवारी दोन ठिकाणी झालेल्या शस्त्रसंधी उल्लंघनात तीन जवान शहीद झाले आहेत. हिंदुस्थानने देखील पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले.

कुपवाडा जिल्ह्यातील नौगाम सेक्टरमध्ये पाकिस्तानने सकाळी गोळीबार करत उखळी तोफांचा मारा केला. या गोळीबारात दोन जवान शहीद झाले तर चार जवान जखमी झाले आहेत. त्याआधी बुधवारी उशीरा रात्री पाकिस्तानने पूँछ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण ऱेषेवर देखील गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केलं. इथेही पाकिस्तानकडून तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला. या गोळीबारात एक जवान शहीद झाला तर काही घरांचे नुकसान झाले आहे. बुधवारी रात्रीपासून सुरू असलेला हा गोळीबार गुरुवारी पहाटे पर्यंत सुरू होता. या गोळीबारात शहीद झालेल्या जवानाचे नाव लान्स नाईक कर्नल सिंग आहे. सिंग यांच्यासोबत आणखी एक जवान जखमी झाला असून त्याच्यावर लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गेल्या पाच दिवसांत पाकिस्तानकडून दररोज शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. पाकिस्तान पूँछ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण ऱेषेवर असलेल्या छोट्या छोट्या गावांना टारगेट करत आहे. सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानने 47 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. तर गेल्या आठ महिन्यात तीन हजारापेक्षा जास्त वेळा सीमाभागात पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला आहे. हा आकडा गेल्या 17 वर्षातील सर्वात मोठा आकडा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या