पाकड्यांचा वॉटरबॉम्ब हल्ला, पंजाबच्या फिरोजपूरमध्ये पूर

1274

हिंदुस्थानच्या सीमेवर घुसखोरी आणि शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन करून नापाक कारवाया करणार्‍या पाकिस्तानने आता सीमेजवळच्या भागांवर वॉटरबॉम्ब टाकायला सुरुवात केली आहे. पंजाब सीमेजवळच्या फिरोजपूर जिल्ह्यांतील काही गावे पाकिस्तानच्या वॉटरबॉम्बमुळे पूरग्रस्त झाली आहेत.

सतलज नदी पाकिस्तान आणि हिंदुस्थानात वाहते. पाकिस्तानने या नदीवर धरण बांधले आहे. या धरणातील पाणी पाकिस्तानने हिंदुस्थानी प्रशासनाला न कळवता सोडल्यामुळे हिंदुस्थानच्या बाजूकडील तेंडीवाला आणि आसपासच्या गावांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे गावांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पंजाब सरकारने एनडीआरएफ आणि लष्करची   पथके मदत आणि बचाव कार्यासाठी तैनात केली आहेत. त्याचबरोबर आरोग्य, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे कर्मचारी नेमले आहेत. फुटलेल्या कालव्यांची तातडीने दुरुस्ती सुरू आहे, असे पंजाब सरकारच्या वतीने सांगण्यात आले.

हा दुसरा वॉटरबॉम्ब हल्ला

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने अशाच प्रकारे हिंदुस्थानी प्रशासनाला न कळवता पाणी सोडल्यामुळे फिरोजपूर जिल्ह्यातील 17 गावे पाण्याखाली गेली होती. त्यामुळे अनेक गावांचे नुकसान झाले होते. संततधार आणि पाकिस्तानने पाणी सोडल्यामुळे आताही यातील काही गावे पाण्यात आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या