
सामना ऑनलाईन, लाहोर
पाकिस्तान हा विचित्र लोकांचा देश आहे, तिथले काही वार्ताहर हे तर भयंकर चेष्टेचा विषय आहे. कधी एखादा वार्ताहर आपल्याच लग्नाचे वार्तांकन करतो, तर एक वार्ताहर पावसाचे वार्तांकन करताना उपस्थित असलेल्या लोकांसोबत पावसाचा आनंद घेत असतो. या सगळ्यावर कहर करणारा पत्रकार आहे तो म्हणजे चांद नवाब, त्याच्या अनेक गमतीशीर वार्तांकनाचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहे. या सगळ्या विचित्र आणि मजेशीर पत्रकारांच्या रांगेत आणखी एकजण येऊन बसलाय. हा वार्ताहर दुनिया न्युज या वृत्तवाहिनीचा पत्रकार आहे. लाहोर शहरात मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. रस्त्यावर किती पाणी तुंबलंय हे दाखवण्यासाठी हे महाशय लहान मुलांच्या प्लास्टिक टबमध्ये बसून बातमी देत होते. तिथल्या महापालिकेवर टीका करणाऱ्या या पत्रकाराची जाम खिल्ली उडवली जात आहे.
त्याच्या वार्तांकनाचा व्हिडिओ व्हायरल होत असून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींचं म्हणणं आहे की या पत्रकाराने वार्तांकनाचा नवा प्रयोग राबवला आहे, तर काहींचे म्हणणे आहे की या वार्ताहराने खर्या अर्थाने टबचा आनंद घेतला आहे. मुसळधार पावासामुळे लाहोरचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जागोजागी पाणी साठल्यामुळे वाहतूकही विस्कळीत झाली होती. इतर माध्यमांनी या बातम्या दाखवल्या तर दुनिया न्युजच्या वार्ताहराने हीच बातमी वेगळ्या स्वरूपात प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न केला.
































































