
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या पाकिस्तानच्या अर्शद नदीमने आपल्या देशातील सरकार आणि अधिकाऱ्यांकडून दिल्या गेलेल्या अपूर्ण आश्वासनांवर आता सवाल उपस्थित केले आहेत. पुरुष भालाफेक स्पर्धेत हिंदुस्थानच्या नीरज चोप्राला पराभूत करत पाकिस्तानसाठी पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या नदीमने खुलासा केला आहे की, त्याला जाहीर करण्यात आलेले जमिनीचे प्लॉट अद्यापि दिले गेलेले नाहीत.
अर्शदने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 92.97 मीटर दूर भाला फेकत इतिहास रचला आणि 2008 मधील डेन्मार्कच्या एंड्रियास धोरकिल्डसनने प्रस्थापित केलेला ऑलिम्पिक विक्रम मोडीत काढला. रौप्यपदकविजेता नीरज चोप्रावर मिळवलेल्या विजयामुळे पाकिस्तानात अभिमानाचे वातावरण होते. सरकार, राज्य अधिकाऱ्यांनी तसेच सार्वजनिक संस्थांनी त्याला रोख बक्षिसे, जमिनीचे प्लॉट आणि विविध सन्मान जाहीर केले होते.
मात्र, एका वर्षानंतर, जिओ टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत नदीमने सांगितले की, ‘माझ्यासाठी जाहीर करण्यात आलेले सर्व प्लॉट केवळ फुसक्या घोषणा होत्या. प्रत्यक्षात ते मला दिले गेले नाहीत. रोख स्वरूपातील सर्व बक्षिसे मात्र मिळाली आहेत.’ या निराशाजनक गोष्टीनंतरही नदीम आपले संपूर्ण लक्ष खेळावर केंद्रित करत आहे. २८ वर्षीय भालाफेकपटूने युवा खेळाडूंना प्रशिक्षण देण्याविषयीच्या आपल्या कटिबद्धतेवर भर दिला आहे.