
सामना प्रतिनिधी । वेळापूर
अध्यात्मिक साधनेचे प्रतिक असलेले रिंगण, आत्म्याची परमात्म्याविषयी ओढ निर्माण करणारा धावा आणि लोकरंजनातून लोकशिक्षण देणारे भारूड असा त्रिवेणी संगम असणार्या भक्तीद्वारे भागवत धर्माची पताका उंचावत निघालेला वैष्णवांचा मेळा सोमवारी ऐतिहासिक वेळापूर नगरीत विसावला. मंगळवारी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण ठाकूरबुवा येथे झाल्यानंतर टप्पा येथील बंधूभेटीच्या सोहळ्यानंतर हा सोहळा पिराची कुरोली येथे पंढरपूर तालुक्यात प्रवेश करेल व भंडीशेगाव मुक्कामी पोहोचेल.
सकाळी 6.30 वाजता माळशिरसहून मार्गस्थ झालेला पालखी सोहळा दुसर्या गोल रिंगणासाठी सकाळी 9 वाजता खुडूस शिवारात पोहोचला. ढगाळ वातावरणात चोपदारांनी रिंगण लावून घेतले. परंपरेप्रमाणे रिंगणाला सुरूवात झाली. सकाळी 9.30 वाजता माऊलींचा अश्व रिंगणासाठी सोडण्यात आला. पुरंदावडे येथील नेत्रदिपक दौडीनंतर अश्वांनी आजही खुडूस येथे नेत्रदिपक दौड करून लाखो भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. त्यामागे स्वाराच्या अश्वानेही नेत्रदिपक दौड करून प्रदक्षिणा पूर्ण केली. माऊलीऽ माऊलीऽऽ नामाचा जयघोष करीत रिंगण सोहळा संपला. त्यानंतर वारकर्यांनी पारंपारिक पद्धतीचे खेळ खेळले. झिम्मा, फुगडी, हुतुतू हे मैदानी खेळ रंगले. या रिंगण सोहळ्यानंतर सोहळा वेळापूरकडे मार्गस्थ झाला. खुडूस ग्रामस्थांचे भक्तीपूर्ण स्वागत स्विकारून श्री ज्ञानराजांचा पालखी सोहळा निमगांव मगराचे (पाटी) येथे दुपारी 12 वाजता पोहोचला. निमगांव, विझोरी, विजयनगर आदि ग्रामपंचायतीच्या वतीने येथे पालखीचे स्वागत करण्यात आले. या परिसरातील हजारो भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. वारकर्यांनी येथे दुपारचे भोजन व विश्रांती घेतली.त्यानंतर हा सोहळा वेळापूरकडे मार्गस्थ झाला. वेळापूर येथे प.पू.डॉ.भाईनाथ महाराज कारखानीस उर्फ आनंदमूर्ती यांच्या समाधी मठाजवळील स्वागत स्विकारल्यानंतर पालखी सोहळ्याने वेळापूर हद्दीत प्रवेश केला. इकोबोर्ड येथे वेळापूरच्या सरपंच सौ.विमल जानकर, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाईंजे, पं.स.सदस्या रेणुका माने-देशमुख, माजी जि.प.सदस्य सतीशराव माने-देशमुख, वेळापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन अमरसिंह माने-देशमुख यांनी सोहळ्याचे स्वागत करून माऊलींचे दर्शन घेतले.
सायंकाळी 5.30 वाजता हा सोहळा वेळापूर मुक्कामाकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी 6.15 वाजता हा सोहळा ज्ञानेश्वर महाराज पालखी तळावर पोहोचला. समाजआरतीनंतर सोहळा वेळापूर मुक्कामी विसावला. मंगळवारी सकाळी ठाकूरबुवा येथे गोल रिंगण, तोंडले येथे नंदाच्या ओढ्यावर दुपारचा विसावा घेवून संत ज्ञानदेव, संत सोपानकाका या दोन बंधूंच्या भेटीच्या सोहळ्यानंतर हा सोहळा पिराची कुरोली येथे पंढरपूर तालुक्यात प्रवेश करेल व भंडीशेगाव मुक्कामी पोहोचेल.




























































