
कोरोना या रोगाशी लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशभर सध्या लॉकडाउन जाहीर केलेला आहे. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठा जीवनावश्यक वस्तू वगळता बंद आहेत. लोकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. जनतेला घरात बसून कंटाळा येऊ नये म्हणून केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने दूरदर्शनवर रामायण, महाभारत आदी जुन्या व लोकप्रिय मालिकांचे पुन:प्रक्षेपण करून जनतेला घरातच खिळवून ठेवण्याचा एक स्तुत्य उपक्रम चालू केला आहे . पण पालम व पालम तालुक्यात वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराने नागरिकांना या मालिका पाहण्याच्या आनंदावर विरजण पडत आहे.
सकाळी नऊ वाजता रामायण या लोकप्रिय मालिकेचे प्रक्षेपण होते परंतु नेमके त्याच वेळेस वीज पुरवठा खंडीत केला जातो. दररोज न चुकता सकाळी रामायण मालिका चालू झाली की हमखास लाईट जाणारच. तसेच दिवसभरात बऱ्याचदा लाईट जात येत असते. पालम महावितरणचे अभियंता स्वामी यांना याबाबत माहिती विचारली असता ते गंगाखेड महावितरणकडे खापर फोडून मोकळे होतात. नेमका प्रॉब्लेम काय आहे वीज पुरवठा खंडित का होतो याचे उत्तर महावितरणचे इंजिनीअर देऊ शकत नाहीत. सध्याच्या किमान लॉकडाऊनच्या काळात तरी पालम वासियांना वीजवितरण मंडळाने सहकार्य करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तरी वीज पुरवठा खंडित करू नये अशी मागणी होत आहे.


























































