महानोरांचे गाव पळसखेडा सहा दिवसांपासून अंधारात!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । फर्दापुर

सोयगाव तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागात वसलेल्या व सुप्रसिद्ध कवी ना. धों. महानोरांचे गाव म्हणून राज्यभर नावलौकिक पावलेल्या पळासखेडा येथे सहा दिवसांपासून काळोख पसरला आहे. सोमवार, ४ जूनपासून येथील विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे तो अद्यापपर्यंतही सुरळीत झालेला नसल्याने सहा दिवसांपासून संपूर्ण गाव अंधारात आहे. येथील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.

कवी ना. धों. महानोर यांचे गाव असलेल्या पळासखेडा येथील वीजपुरवठा, ४ जून रोजी खंडित झाला. त्यानंतर येथील नागरिकांनी महावितरण कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून वीजपुरवठा सुरळीत करण्याची विनंती केली. मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत येथील वीजपुरवठा सुरळीत करण्यास टाळाटाळ केल्याने सहा दिवसापासून हे गाव अंधारात असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.

दरम्यान, ४ जूनपासून पळासखेडा गावात काळोख पसरून येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वीज नसल्यामुळे सहा दिवसांपासून येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन ते तीन कि.मी. पर्यंत भटकंती करीत फिरावे लागत आहे. वीज नसल्यामुळे गावातील गिरण्याही बंद आहेत. येथील नागरिकांना दळण दळण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील वाकोद या गावात जावे लागत आहे. परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी ठिबक करून मे महिन्यातच पेरणी उरकली आहे. मात्र सहा दिवसांपासून येथील वीजपुरवठा खंडित झाल्याने पाण्याअभावी शेतातील उभी पिके कोमेजायला लागली असून, दुबार पेरणीचे संकट केवळ महावितरणच्या नाकर्तेपणामुळे ओढवल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल सोहोनी यांनी केला आहे.

सहा दिवसांपासून येथील नागरिक महावितरणच्या कर्मचाऱ्यांना पळासखेडा येथील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी विनवणी करीत आहेत. मात्र कर्मचारी बिघाड कुठे झाला आहे हे सापडत नाही, तर कधी आमच्याकडे अपूर्ण मनुष्यबळ आहे, कर्मचारी उपलब्ध झाल्यावर वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करू, अशी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. दरम्यान, आता पळासखेडा येथील नागरिकांचा संयम सुटत चालला असून, लवकरच येथील वीजपुरवठा सुरळीत न केल्यास महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.