मुख्यमंत्र्यांविरोधात काँग्रेस मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आलेली साम-दाम-दंड-भेदाची भाषा, पैसेवाटपाचे झालेले प्रयत्न तसेच ईव्हीएममधील घोळ यासंदर्भात काँग्रेसकडून मुख्य निवडणूक आयुक्तांकडे उद्या तक्रार करण्यात येणार आहे.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पक्षाकडून वारंवार निवडणूक आचारसंहितेचा भंग आणि सत्तेचा दुरुपयोग केला गेला आहे. तसेच संपूर्ण निवडणूक यंत्रणा सत्तेच्या दबावाखाली काम करत होती का? अशी शंका निर्माण करणारी परिस्थिती संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान दिसून आली असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.  यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. मात्र त्यांच्याकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ उद्या मंगळवारी सकाळी ११.००वाजता दिल्लीतील मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांची भेट घेऊन तक्रार दाखल करणार आहे.