
आदिवासीबहुल पालघर जिल्ह्यातील बालमृत्यू, अर्भक मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात आणण्यात आरोग्य विभागाला यश मिळत आहे. 2018 वर्षाच्या तुलनेत 2019 मधील बालमृत्यूचे प्रमाण घटले. आता 2020 मध्ये कुपोषिताचा शिक्का पुसून सदृढ जिल्हा करण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे.
पालघर जिल्ह्यातील बालमृत्यूचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी कृतिशील कार्यक्रम राबवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. एकूणच आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी त्यांनी माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना पालघर जिल्ह्याचा दौरा करण्याचे आदेश दिले होते. यानुसार नुकतीच डॉ. दीपक सावंत यांनी डिसेंबर-जानेवारी महिन्यात कासा, डहाणू येथे भेट दिली. यावेळी कुपोषित बालकांची म्हणजेच सॅम, मॅमच्या मुलांची संख्या कमी होत असल्याचे आढळले. एचबी 12 मिशनमुळे स्त्रियांचे हिमोग्लोबीन वाढत आहे. आश्रमशाळेतील व शाळाबाह्य मुलींचे हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी व ते सतत कायम ठेवण्यासाठी आरोग्य खात्यास सातत्याने प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या. आरोग्य विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले.
‘बोहाडा’चा परिणाम
अनेकदा गरोदर मातांमध्ये शारीरिक व्यंगत्वाची मुले जन्माला येत आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी ‘बोहाडा’ या प्रकारात कुटुंबनियोजन संतती नियमन, स्त्री आरोग्य, हिमोग्लोबीन तपासणी, अंधश्रद्धा निर्मूलन याविषयी जागृती केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम समाजावर होईल, असे डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले.

























































