
शिंदे गटाची सत्ता असलेल्या पालघर नगर परिषदेत सवादोन कोटी रुपयांचा कचरा घोटाळा झाल्याचा भंडाफोड भाजपच्या नगरसेवकाने केला आहे. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. कचऱ्यावर प्रक्रिया न करताच डी. जी. वेस्ट मॅनेजमेंट या ठेकेदाराचे ३३ महिन्यांचे दोन कोटींहून अधिक रकमेचे बिल मंजूर करण्यात आले. ठेकेदारावर नेमके कोण मेहेरबान आहे, असाही सवाल बैठकीत केला असून कचरा घोटाळा पेटण्याची चिन्हे आहेत.
कचऱ्यावर प्रक्रिया करून ओला व सुका कचरा वेगळा करून त्याचे वर्गीकरण होते. कचऱ्याचे विलगीकरण झाल्यानंतर खत बनवण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर आहे. मात्र या घनकचरा विलगीकरणाच्या कामात सवादोन कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक भावानंद संखे यांनी नगर परिषदेच्या सर्वसाधारण बैठकीत केला.
फक्त चार कामगार
घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ठेकेदाराला अटी, शर्ती घातल्या असून प्रत्यक्षात त्याचे पालन होत नसल्याचा आरोप नगरसेवक भावानंद संखे यांनी केला. एवढेच नव्हे तर क्षेपणभूमीवर पंधरा कामगार ठेवण्याऐवजी फक्त चार कामगार काम करत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
पालघरमधील कचरा गोळा करण्यासाठी ५० ते ५७ लाख रुपये दर महिना खर्च येतो. त्यासाठी डी. जी. वेस्ट मॅनेजमेंटला दरमहा १२ लाख रुपयांचा ठेका दिला आहे.
शहरातील कचरा घोटाळ्याची दहा दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करावा, असे निर्देश नगराध्यक्ष उत्तम घरत यांनी प्रशासनाला दिले आहेत. या सभेत कचऱ्याचाच मुद्दा सर्वाधिक गाजला.




























































