पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर मिंधे गटाचा दबाव; शिवसेनेच्या स्वीकृत नगरसेवक उमेदवारांचे अर्ज केले बाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालघर नगर परिषदेत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सर्वाधिक 14 सदस्य असतानाही स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडणुकीत आज मिंधे गटाने प्रशासनाच्या आडून रडीचा डाव खेळला. या निवडणुकीत पराभव डोळ्यांसमोर दिसत असल्याने मिंध्यांनी दबावतंत्र टाकून शिवसेनेच्या वतीने नामनिर्देशपत्र दाखल केलेल्या मनोज घरत व सुनील महेंद्रकर यांचे अर्ज तकलादू कारणे देत बाद केले. त्याचवेळी एकाही नगरसेवकाची शिफारस नसताना जिल्हाध्यक्षाच्या पत्रावर मिंधे गटाच्या उमेदवाराचा अर्ज जिल्हाधिकाऱयांनी वैध ठरवला. या घटनेमुळे पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके हे मिंधेंच्या दबावाखाली आहेत काय? त्यांच्या दबावामुळेच कायदा धाब्यावर बसवून जिल्हाधिकाऱयांनी मिंधेंच्या उमेदवाराच्या पारडय़ात विजयाचे दान टाकले काय, असा सवाल पालघरवासीयांनी केला असून या उफराटय़ा कारवाईविरोधात संताप व्यक्त होत आहे.

पालघर नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची निवडणूक एप्रिल 2022 मध्ये होणार होती. त्यावेळीदेखील शिवसेनेचे मनोज घरत व सुनील महेंद्रकर यांनी नामनिर्देशपत्र दाखल केले होते. मात्र राजकीय सूडबुद्धीने पेटलेल्या मिंध्यांनी आयोजित केलेली विशेष सभा नगराध्यक्षांना हाताशी धरून स्थगित करण्यास भाग पाडले होते. याविरोधात पालिकेतील शिवसेनेचे गटनेता कैलास म्हात्रे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याची गंभीर दखल घेत न्यायालयाने जिल्हाधिकाऱयांना फटकारत तीन आठवडय़ांत स्थगित केलेली ही निवडणूक घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे तंतरलेल्या प्रशासनाने आज विशेष सभा आयोजित केली होती.

नगर परिषदेत शिवसेनेचे 14 सदस्य असल्याने मनोज घरत व सुनील महेंद्रकर यांचा विजय निश्चित मानला जात होता, परंतु केवळ ते संस्थेचे पदाधिकारी नसल्याचे कारण देत मिंधे गटाने आक्षेप घेतला, तर शिवसेनेनेही मिंधे गटाच्या उमेदवारांच्या नामनिर्देशपत्रावर शिफारस नसल्याने त्यांचे अर्ज अवैध ठरवावेत अशी मागणी केली. हा वाद बुधवारी जिल्हाधिकाऱयांसमोर गेला. मात्र सत्ताधाऱयांच्या दबावाखाली सर्व नियम डावलून शिवसेनेच्या उमेदवारांना अपात्र ठरवतानाच एकाचीही शिफारस नसलेल्या मिंधे गटाच्या धर्मेंद्र भट यांचा अर्ज वैध ठरवण्यात आला, तर पालिकेची थकबाकी असल्याने रईस खान यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे.

कोर्टात दाद मागणार
कायदा गुंडाळून शिवसेना उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले. याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागू. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटनेता कैलास म्हात्रे यांनी सांगितले.

पालघर नगर परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे 14 नगरसेवक आहेत, तर भाजपचे 7, राष्ट्रवादी 2, अपक्ष 5 असे पक्षीय बलाबल आहे. नगर परिषदेत गद्दारांचा एकही नगरसेवक नाही. असे असताना शिवसेनेचे उमेदवार विजयी होऊ नयेत म्हणून राजकीय दबाव टाकून या निवडणुकीत सर्व नियम पायदळी तुडवण्यात आले.