
>> सचिन जगताप
घोंघावणारे मोंथा वादळ… उसळणाऱ्या उंच लाटा आणि मुसळधार पाऊस यामुळे पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांवर अक्षरशः ‘आभाळ’ कोसळले आहे. मोठ्या मेहनतीने सुकवलेली मच्छी भिजल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. एकीकडे पाऊस, वादळाचे बसणारे तडाखे आणि दुसरीकडे फुटक्या कवडीचीही नुकसानभरपाई न देणारे निर्दयी सरकार याच्या कचाट्यात हजारो मच्छीमार कुटुंबे सापडली आहेत. हजारो किलो वजनाची भिजलेली मासळी समुद्रात फेकून देण्याची वेळ मच्छीमारांवर आली आहे. आता घरखर्च कसा भागवायचा? मुलाबाळांची शिक्षणे, आजारपण कसे करायचे? या चिंतेने त्यांची झोपच उडाली आहे.
हवामान बदलल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासूनच पालघर जिल्ह्यातील शेतकरी व मच्छीमारांच्या दुर्दैवाचे फेरे सुरू आहेत. अवकाळी पावसाने उभी पिके आडवी झाली. शेतकरी हवालदिल झाला. आता मच्छीमारदेखील या अस्मानी संकटामुळे देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात हवामान बदलल्याने तसेच वादळी वारे व पाऊस आल्यामुळे खलाशांनी आपल्या बोटी समुद्रात नेल्या नव्हत्या. त्यामुळे बर्फ, डिझेल असा प्रत्येक फेरीचा २० ते ५० हजार रुपयांचा खर्च वाया गेला आहे. मच्छीमारांनी कर्ज काढून मासेमारीसाठी पैसा उभा केला, पण आता मासेमारीवरच पाणी फिरल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सरकारने तोंडाला पाने पुसली
मच्छीमार समाजाला सरकार नेहमी दुजाभावाची वागणूक देत आहे. मासेमारीचे नुकसान असो की मासळीचे, पण कोणतीही मदत आजतागायत सरकारकडून मिळालेली नाही. केवळ मदत देऊ असे सांगून मच्छीमारांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम या सरकारने केले आहे. आम्हा मच्छीमारांना कुणी वाली आहे की नाही, असा सवाल महाराष्ट्र राज्य मच्छीमार शिखर संघाचे संचालक जयकुमार भाय यांनी केला आहे.
पोटापाण्याचा आधार हरपला
अलीकडच्या काळात बोंबील, मांदेली, करदी या माशांचे भरघोस उत्पादन मिळाले होते त्यामुळे सुक्या मासळीला चांगले दिवस येतील असे महिलांना वाटत असताना अवकाळीने त्यांच्यावर संकट कोसळले. मचाणावर सुकलेली मासळी अवकाळी पावसाने पूर्णपणे भिजून गेली आहे. काही ठिकाणी तर ही मासळी कुजण्याच्या अवस्थेत असून किनारी भागात दुर्गंधी पसरली आहे. ज्या सुक्या मासळीच्या आधारे मच्छीमार महिला आपल्या कुटुंबाच्या पोटापाण्याचा प्रश्न भागवतात ती मासळी फेकून द्यावी लागत आहे. त्यामुळे महिलांच्या डोळ्यात अश्रू तरळत आहेत. मोंथा वादळाने दिलेल्या तडाख्यानंतर पालघरमधील हजारो मच्छीमार कुटुंबे आता आर्थिक संकटाच्या वादळात सापडली आहेत.
त्वरित भरपाई द्या
मच्छीमार समाजासह सुक्या मासळीचा व्यवसाय करणाऱ्या मोठ्या रोजगाराच्या साखळीवर नुकसानीमुळे मोठा परिणाम होणार आहे. दरवेळी नुकसान होऊनही अपेक्षित नुकसानभरपाई दिली जात नाही. मच्छीमार समाज नेहमी दुर्लक्षित ठेवला जातो. आता झालेल्या नुकसानीची तरी त्वरित भरपाई द्या, अशी मागणी ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संघाचे अध्यक्ष जयवंत तांडेल यांनी केली आहे.
- वसई, अर्नाळा, उत्तन, नायगाव, वसई अशी प्रमुख मासेमारी बंदरे आहेत. तेथे यांत्रिक तसेच पारंपरिक पद्धतीने मासेमारी केली जाते. १८०३ मासेमारी बोटींना परवाने आहेत. त्यातील १७७० बोटी यांत्रिक तर ३३ बोटी बिगर यांत्रिक आहेत.
- जिल्ह्यामध्ये ५०५७ मच्छीमार असून मासेमारी, सुकी मासळी विकणे, मासळी सुकवणे अशा विविध व्यवसायाशी निगडित तब्बल ३५ हजार १०४ मच्छीमार महिला कार्यरत आहेत.
- गेल्या वर्षी पालघर किनारपट्टी भागातून तसेच प्रमुख मासेमारी बंदरातून ३१ हजार १८१ मेट्रिक टन मत्स्य उत्पन्न झाले होते. आता हवामान बदलाच्या फटक्यामुळे हे उत्पन्न कमी झाले आहे.
- झाई, आगर, डहाणू खाडी, धाकटी डहाणू, चिंचणी, तारापूर, उछळी, दांडी, नवापूर, मुरबे खाडी, सातपाटी, दातिवरे, एडवण, कोरे, मथाने, अर्नाळा, कळंब, वसई, नायगाव अशी मासेमारी करणारी प्रमुख गावे आहेत.

























































