
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला विरोध असूनही प्रवाशांच्या माथी हा प्रकल्प केंद्र सरकारने लादला आहे. हा प्रकल्प पालघर जिल्ह्यातून जात असून संपूर्ण मोबदला न देताच काम सुरू केल्याने शिगावमधील ग्रामस्थ आज आक्रमक झाले. आधी पूर्ण मोबदला द्या.. मगच काम करा, अशी कडक भूमिका घेत त्यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम रोखून धरले. सरकारच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या. यावेळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
पालघर तालुक्यातील शिगाव येथील सर्व्हे क्रमांक ४६४ मधून बुलेट ट्रेनचा मार्ग जात असून या जागेतील १६ नागरिकांची घरे आणि इतर मालमत्ता बाधित झाल्या आहेत. संपूर्ण मोबदला न देताच काम सुरू केल्याने नागरिक संतप्त झाले होते. बाधित घरांचा शिल्लक मोबदला मिळावा या मागणीसाठी आदिवासी एकता परिषदेचे भरत वायडा यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक ग्रामस्थांनी बुलेट ट्रेनचे सुरू असलेले काम बंद पाडले.
स्थानिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न
बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे बाधित झालेली घरे आणि इतर मालमत्तांचा संपूर्ण मोबदला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत काम सुरू न करून देण्याची भूमिका नागरिकांनी घेतली. नागरिकांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम बंद करताच बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश अस्वार यांच्यासह मंडळ अधिकारी विजय गुंडकर, बुलेट ट्रेन प्रकल्पाचे अधिकारी यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. तसेच संतप्त नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
























































