
ऐन मे महिन्यात पावसाने ठाणे आणि रायगड जिल्ह्यात अक्षरशः धुमशान घातले. रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने सोमवार गाजवला. त्यामुळे ठिकठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. रायगड जिल्ह्यात मुरुडमध्ये 24 तासांत सर्वाधिक 371 मिमी पावसाची नोंद झाली. रस्त्यांच्या नद्या झाल्या, घराघरात पाणी घुसले. महाडमध्ये रायगड रस्त्यावर कोंझर येथील धबधब्यामुळे भलामोठा खड्डा पडून रस्ताच खचला. त्यामुळे रायगड किल्ल्याच्या वाटेवरील गावांकडे जाणारा मार्गच बंद झाला. उल्हासनगरात झाडे कोसळली. त्याखाली काही वाहने दबली. मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर मोहपाड्याजवळ दरड कोसळली. सुदैवाने त्यावेळी तेथून कोणतीही वाहने न गेल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या एक्स्प्रेस वेवरील केवळ एकच मार्ग सुरू असल्याने काही काळ वाहतूककोंडी झाली. पण आश्चर्याची बाब म्हणजे पालघरमध्ये आज एक थेंबही पाऊस पडला नाही. वातावरण पूर्णपणे निरभ्र होते आणि तापमानही 31 अंश सेल्सियसपेक्षा जास्त होते. त्यामुळे एकीकडे लगतच्या ठाणे, रायगड जिल्ह्यात धुवांधार पावसाने दाणादाण उडाली असताना पालघर मात्र तापले होते. त्यांचा पुरता घामटा निघाला होता.
उरण शहर आणि परिसरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले. कळंबुसरे गावातील 35 घरांचे पत्रे आणि कौले उडाली. एका घराची भिंत कोसळून अभिषेक जाधव हा इसम जखमी झाला. चिरनेर येथेही घरांचे नुकसान झाले. सारडे वेलवाडी आदिवासी पाड्यातील काही घरेही कोसळली. कोसळणारा पाऊस आणि समुद्राची भरती यामुळे उरण शहर व परिसरातील गावांत कमरेएवढे पाणी साचले होते.
डोंबिवली कल्याण तालुक्यातील मोहिली गावाजवळ उल्हास नदीला पूर आल्याने या पुरात गावातील देऊ गायकर, शंकर पाटील आणि सावळाराम वाघे हे तीन गुराखी अडकून पडले होते. या घटनेची माहिती मिळताच केडीएमसी, अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आणि त्यांनी बचाव कार्य सुरू केले. यावेळी गावातील गुरुनाथ पवार आणि रोहन पवार या धाडसी तरुणांनी पुढाकार घेतला आणि छोट्या बोटीतून ते या गुराख्यांपर्यंत पोहोचले आणि त्यांची पुरातून सुटका केली.
मुरुड तालुक्यात गेल्या 24 तासांत सर्वाधिक 371 मिमी पाऊस कोसळला. लक्ष्मीखार, दत्तवाडी, शिघ्र, सायगाव या परिसराला अक्षरशः नदीचे स्वरुप आले होते. सायगाव पूल पाण्याखाली गेला. बोर्ली, मांडला, आगरदांडा, एकदरा, विहूर या गावांतील रस्तेही पाण्याखाली गेले होते. ऐन मे महिन्यात पूरपरिस्थिती उद्भवली होती.
रसायनी सोमवारी पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह आलेल्या तुफानी पावसाने मोहपाडा, रसायनी, पाताळगंगा परिसराला झोडपून काढले. या गावांमधील रस्ते पाण्याखाली गेले. लोहोपजवळ भररस्त्यावर महाकाय वृक्ष कोसळला. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली. त्याचे मोठमोठे दगड आणि मातीचे ढीग दुसऱ्या व तिसऱ्या लेनवर आले. त्यामुळे तातडीने सेफ्टी कोन लावून या लेन बंद करण्यात आल्या आणि एका लेनवरून वाहतूक सुरू करण्यात आली.
कर्जत बिरदोले गावात अंगावर वीज पडून रोशन कालेकर (27) या तरुणाचा मृत्यू झाला. कालेकर यांची शेती उल्हास नदीजवळ आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे नदीला पूर आला होता. या पुरात शेतीचे किती नुकसान झाले आहे हे पाहण्यासाठी रोशन सकाळी 7 वाजता छत्री घेऊन गेला. बराच वेळ झाल्यानंतर तो पुन्हा परतला नाही म्हणून घरच्यांनी त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह सापडला.
बदलापुरात धो धो पावसामुळे उल्हास नदीची पातळी पूरनियंत्रण रेषेवर पोहोचली असून बदलापुरात चार तासांत 160 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुराचे पाणी बाजारपेठ आणि सखल भागात शिरल्याने अनेक दुकाने व घरांमध्ये पाणी घुसले. बदलापूर पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या बेलवली भुयारी मार्गात पाणी वाढल्याने तेथे कारचालक पुराच्या पाण्यात अडकून पडला. आजूबाजूच्या लोकांनी प्रसंगावधान राखून त्याला वाचवले. बदलापूरच्या रेल्वे भुयारी मार्गात पाण्याच्या प्रवाहाचे लोट आल्याने हा भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला. बदलापूर रेल्वे स्थानकातील रूळही पाण्याखाली गेले होते.
कल्याण-मुरबाड-नगर महामार्गावरील रायते येथे उल्हास नदीवरील पुलाचे गाळे बुडाले. त्यामुळे टिटवाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी दक्षता म्हणून हा रस्ता तात्पुरता बंद केला. रायते गावातील अनेक कुटुंबांनी पुराच्या भीतीने घरातील साहित्याचे स्थलांतर केले आहे.
उल्हासनगर मध्ये मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने उल्हासनगरात ठिकठिकाणी झाडे कोसळली. सिंधू नॅशनल हायस्कूलजवळ भलेमोठे रेन ट्री कोसळले. त्याखाली कार, रिक्षा आणि दुचाकी दबल्या. अग्निशमन दलाच्या मुख्य अधिकारी सुरेश बोंबे यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेऊन छाटण्या केल्या आणि गाड्यांना बाहेर काढले.
टिटवाळा कल्याण तालुक्यातील फळेगाव येथे गुरुनाथ बांगर यांच्या गोठ्यावर वीज कोसळून चार वासरे जागीच ठार झाली. या घटनेने बांगर कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसला असून त्यांना तत्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे
तुफानी पावसामुळे पेण तालुक्यातील हमरापूर, जोरे, कळवे भागातील गणेशमूर्ती कारखान्यात पाणी शिरून कारखानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. भोगावती नदी दुथडी भरून वहात असून वाक्क्रुळ, वरवणे रस्ता, नारा, निंबाळवाडी रस्ता, लाकोले पावसाने खचला असून त्यामुळे ग्रामस्थ व वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वाक्रुळ, कामालीं, हनुमानपाडा, खारपाडा या गावातील घरांमध्ये पाणी शिरून गावकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.