महापौर पंचम कलानींचा मराठी द्वेष

113

सामना प्रतिनिधी, उल्हासनगर

उल्हासनगरात भाजपसोबत सत्तेत असलेल्या कलानी गटाच्या महापौर पंचम कलानी या मराठी भाषेचा द्वेष करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण महासभेत महापौर कलानी यांनी ‘मुझे मराठी नही आती.. सिंधी मे बोलो..’ असे मुजोर वक्तव्य केल्याने उल्हासनगरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून महाराष्ट्रात जन्माला येऊनही या महापौरांना मराठी कसे बोलता येत नाही, असा सवाल विचारला जात आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने गुरुवार ते शुक्रवार असे 30 तास पाणीकपात करण्याचे आदेश जारी केले. त्याचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. यावेळी सत्ताधाऱ्यांसोबत विरोधी पक्षाने महापौर पंचम कलानी आणि आयुक्त अच्युत हांगे यांना घेरले. पाणीप्रश्न सोडवा असे सांगत सर्व नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला. नगरसेवक विजय पाटील यांनी पाणीप्रश्नावर महापौरांना जाब विचारला. मात्र इतके होऊनही महापौर कलानी यांनी अधिकाऱ्यांना बोलावून पाणीप्रश्न सोडविण्याबाबत कोणतीही हालचाल केली नाही.

त्यामुळे नगरसेवकांनी अक्षरशः सभागृह डोक्यावर घेतले. त्यावेळी महापौर पंचम कलानी यांनी ‘मुझे मराठी आती नही.. जो भी कुछ बोलना हो वो सिंधी मे बोलो..’ असे मुजोर उत्तर दिले. त्यामुळे नगरसेवक संतापले. आता तुम्हाला आम्ही सिंधीत सांगायचे काय? असा सवालही केला. महासभेचा हा व्हिडीओ व्हायरल झाला. महापौर असलेल्या कलानी यांनी असे मुजोर वक्तव्य करू नयेत. मराठी शिकून घ्यावे आणि मगच अधिकारपदावर बसावे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या