ड्रग्समधून मिळालेला पैसा निवडणुकांमध्ये वापरला जातो का? सुषमा अंधारे यांचा गंभीर सवाल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पाचगणीतील कथित ड्रग्स प्रकरणावरून सरकार, प्रशासन आणि विशेषतः साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पाचगणीमध्ये झालेल्या कारवाईत 45 किलो कोकेन जप्त झाल्याचा उल्लेख करत, या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची नावे जाहीर केली पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. त्यांनी मोहम्मद नावेद सलीम परमार (भेंडी बाजार), अंसारी (बिलाल मस्जिद, नागपाडा), सोहेल हशिद खान (मुंबई), मोहम्मद ओयस रिजवान (भिवंडी) यांच्यासह अन्य आरोपींची नावे वाचून दाखवली. “हिंदुत्व धोक्यात असल्याची भाषा करणाऱ्या पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यातील पाचगणीसारख्या महत्त्वाच्या पर्यटनस्थळी ड्रग्सचा विळखा असेल आणि पालकमंत्र्यांनाच त्याची कल्पना नसेल, तर त्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार आहे का?” असा थेट सवाल त्यांनी केला. पाचगणी हे ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखले जाणारे पर्यटनस्थळ असून, अशा ठिकाणी ड्रग्ससारखे गंभीर प्रकार घडत असतील तर राज्याच्या सुरक्षिततेवरही प्रश्न निर्माण होतो, असे अंधारे म्हणाल्या.

या प्रकरणात मुंबईहून आलेल्या यंत्रणांनी कारवाई केली, मात्र स्थानिक पातळीवर हालचाल न झाल्याबद्दल त्यांनी तुषार दोशी आणि प्रशासनालाही लक्ष्य केले. “मुंबईचे अधिकारी कारवाई करतात, पण साताऱ्यातील यंत्रणा ढिम्म का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांनी प्रकाश शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले. प्रकाश शिंदे यांनी संबंधित हॉटेल किंवा रिसॉर्टशी आपला संबंध नसल्याचे सांगितले असले, तरी गुगल सर्च, ऑनलाईन बुकिंग प्लॅटफॉर्म, रेटिंग, मालकाचे नाव, फोन नंबर आणि मुलांची नावे यावरून हे हॉटेल प्रत्यक्षात प्रकाश शिंदे यांच्याच नावावर चालते, असे त्यांनी पत्रकार परिषदेत थेट लाईव्ह दाखवून सांगितले. “हे सगळे पुरावे मी स्क्रीन रेकॉर्डिंग करून ठेवले आहेत. आता हे डिलीट करून काही उपयोग नाही,” असा इशाराही त्यांनी दिला. ड्रग्समधून मिळालेला पैसा निवडणुकांमध्ये वापरला जातो का, असा सवाल करत त्यांनी “22-25 हजार रुपयांत मत विकत घेतले जाऊ शकते,” असा गंभीर आरोप केला.

अंधारे यांनी पुढे कोयना धरण परिसरातील नियमभंगाचाही मुद्दा उपस्थित केला. कोयना धरणाच्या 75 मीटर प्रतिबंधित क्षेत्रात कोणतेही व्यावसायिक किंवा निवासी बांधकाम करता येत नाही, तरीही पाचगणी परिसरात नियमबाह्य बांधकाम कसे झाले, याची जबाबदारी पालकमंत्र्यांनी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. “जर तुमच्या अधिकारातील अभियंत्यांनी हे सांगितले नसेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत तुमच्यात आहे का?” असा थेट सवाल त्यांनी केला. यासोबतच, जर त्या ठिकाणी ड्रग्सऐवजी स्फोटकांचा कारखाना असता, तर राज्यातील नेत्यांच्या सुरक्षेला किती मोठा धोका निर्माण झाला असता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पत्रकार परिषदेनंतर अवघ्या दोन तासांत संबंधित अधिकारी घटनास्थळी कसे पोहोचले, यावरही त्यांनी संशय व्यक्त केला.

या संपूर्ण प्रकरणावर निष्पक्ष चौकशी व्हावी, कोणालाही मंत्रिपदाच्या सत्तेचा किंवा उपमुख्यमंत्री पदाच्या विशेषाधिकाराचा फायदा मिळू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. “मी कोणालाही आरोपी ठरवत नाही, पण ज्यांची नावे चर्चेत आहेत, त्यांची चौकशी झालीच पाहिजे,” असे स्पष्ट करत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा एकदा लावून धरली. यापूर्वी महाविकास आघाडीतील नेत्यांनी चौकशीसाठी राजीनामे दिल्याची उदाहरणे देत, “निष्पक्ष तपासासाठी सत्तेपासून बाजूला होणे आवश्यक आहे,” असे त्या म्हणाल्या. या प्रकरणावर संसदेत आवाज उठवण्यासाठी शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि अरविंद सावंत प्रयत्न करणार असून, केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेण्याचीही तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना भेटून हा मुद्दा मांडणार असल्याचे जाहीर केले. अखेरीस, या प्रकरणातील तपासात सहभागी अधिकारी, साक्षीदार आणि आरोपींच्या सुरक्षेचीही जबाबदारी सरकारने घ्यावी, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.