
1904 सालापासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात तीनवेळा सामान्य नागरिकांची घरे ताब्यात घेऊन विकासकामे करण्यात आली आहेत. आता कॉरिडॉरच्या नावाखाली चौथ्यांदा येथील नागरिकांना बेघर करण्याचा आराखडा तयार करण्यात आला असल्याचा आरोप मंदिर परिसर बचाव संघर्ष समितीचे प्रवक्ते रामकृष्ण महाराज वीर यांनी केला. या कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी पंढरपुरात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात ‘मंदिर परिसर बचाव समिती’चे कार्यकर्ते महिला, मुलांसह सहभागी झाले होते. यावेळी प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर कॉरिडॉरची घोषणा केल्यापासून याला स्थानिकांनी विरोध सुरू केला आहे. यासाठी ‘मंदिर परिसर बचाव संघर्ष समिती’ स्थापन करण्यात आली असून, समितीच्या वतीने आज एक हजार नागरिकांच्या हरकती प्रांताधिकारी गजानन गुरव, नगरपरिषद मुख्याधिकारी अरविंद माळी यांना देण्यात आल्या. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते व नगरसेवकांनी सहभागी होऊन कॉरिडॉरला विरोध दर्शविला.
मोर्चाच्या सुरुवातीला संत नामदेव पायरी व संत चोखामेळा यांच्या समाधीचे दर्शन घेऊन मंदिर परिसरातील कॉरिडॉर रद्द करावा, असे विठ्ठल-रुक्मिणीला साकडे घालण्यात आले. यानंतर मंदिर प्रदक्षिणा करून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पंढरपूर नगरपरिषद येथे आंदोलक दाखल झाले. आंदोलनात लहान मुले, महिला, नागरिक व व्यापारी यांनी गर्दी केली होती. मंदिर परिसर बचाव समितीसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), भाजप, मनसे, राष्ट्रवादी, समता परिषद, शहर विकास आघाडी, तीर्थक्षेत्र विकास आघाडी, हिंदू महासभा, मी वडार आदी पक्ष व संघटनेच्या पदाधिकाऱयांनी सहभाग घेत कॉरिडॉरला विरोध दर्शविला.
निवेदन स्वीकारल्यानंतर प्रांताधिकारी गुरव यांनी नागरिकांच्या तीव्र भावना शासनास कळविण्याचे आश्वासन दिले. तसेच, सोमवारी (दि. 21) विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या समवेत आराखडय़ासंर्भात होणाऱया बैठकीत नागरिकांच्या सूचना मांडणार असल्याचे सांगितले.
आंदोलनात माजी नगराध्यक्षा साधना भोसले, दिलीप धोत्रे, प्रणव परिचारक, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, शिवसेना तालुकाप्रमुख संजय घोडके, अनिल अभंगराव, विक्रम शिरसट, संग्राम अभ्यंकर, निलराज डोंबे, सुधीर धोत्रे, किरण घाडगे, महंमद उस्ताद, अरुण कोळी, धनंजय कोताळकर, विवेक बेणारे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सत्यविजय मोहोळकर व मंदिर परिसर बचाव समितीचे अध्यक्ष नाना कवठेकर, प्रवक्ते रामकृष्ण महाराज वीर, बाबाराव महाजन, रा. पां. कटेकर, शैलेश बडवे, ऋषिकेश उत्पात, श्रीकांत हरिदास, गणेश लंके, साईनाथ बडवे, राजाभाऊ नलबिलवार, संजय झव्हेरी आदी सहभागी झाले होते.
बचाव समितीच्या विविध मागण्या
मंदिर परिसर बचाव समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनात दहा मुद्दे मांडण्यात आले आहेत. यामध्ये 1904 साली सध्याच्या ज्ञानेश्वर दर्शन मंडपासाठी नागरिकांची घरे ताब्यात घेण्यात आली. यानंतर संत तुकाराम भवन, रुक्मिणी पटांगण येथील घरे ताब्यात घेण्यात आली, तर 1982 साली पन्नास फूट रुंदीकरण करण्यात आले. आता याच परिसरात कॉरिडॉर करण्याला विरोध केला. पंढरीत श्री विठ्ठल मंदिरासह येथील मठ, पुरातन वास्तू, परंपरा यांना देखील मोठे महत्त्व असून, रुंदीकरणात यास बाधा होणार आहे. लहान गल्लीबोळांमुळे पूर्वी मंदिर विविध हल्ल्यांतून सुरक्षित राहिले. आता अनेक रस्ते मोठे करून मंदिराची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. पंढरपूरच्या पैलतीरावर, 65 एकर किंवा चंद्रभागेवर भव्य उड्डाणपूल उभारून कॉरिडॉर करावा, आदी मागण्या करण्यात आल्या.





























































