
बुधवारी आषाढवारी. दरवर्षी या दिवशी पंढरपुरात लाखो विठ्ठलभक्तांची मांदियाळी असते. उद्या मात्र ते चित्र नसेल. ‘एक एका सहाय्य करू। अवघे विश्व कोरोनामुक्त करू।। हेचिं मागणं पांडुरंग चरणी करू। अवघाची संसार सुखाचा करू।।’ असे मागणे मागत अवघा महाराष्ट्र घरात बसूनच श्री विठ्ठलाची आराधना करणार आहे. आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांसह सर्व मानाच्या संतांच्या पालख्या रात्री पंढरीत दाखल झाल्या. पालखी तळावर फुलांच्या पायघडय़ा घालून सर्व संतांचे भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे सायंकाळी विठूरायाच्या नगरीत दाखल झाले. पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्नीक विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा करणार आहेत. यावेळी ते सुजलाम्-सुफलाम् महाराष्ट्रासाठी श्री विठ्ठलाला साकडे घालतील.
आषाढी वारीसाठी लाखो वारकरी एकत्र आल्यास कोरोनाचा संसर्ग होऊन धोका उद्भवू शकतो, हे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य शासनाने आषाढी वारीचा सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शेकडो वर्षांची वारीची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी वारीला फक्त मानाच्या नऊ पालख्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज मानाच्या नऊ संतांच्या पालख्या फुलांनी सजविलेल्या एसटी बसने रात्री पंढरपूरमध्ये दाखल झाल्या. यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी, संत तुकाराम महाराज संस्थान देहू, संत सोपानदेव महाराज संस्थान सासवड, संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान त्र्यंबकेश्वर, संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर, संत एकनाथ महाराज संस्थान पैठण, संत नामदेव महाराज संस्थान पंढरपूर, श्री विठ्ठल-रखुमाई संस्थान कौंडण्यपूर, चांगवटेश्वर देवस्थान सासवड या संतांचा समावेश होता.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगतगुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीसह मानाच्या संतांच्या पालख्या रात्री पालखी तळावर दाखल झाल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज पंढरपुरात आगमन झाले. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री दत्तात्रय धरणे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हे उपस्थित होते.
आज विठ्ठलाची सपत्नीक पूजा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते पहाटे महापूजा होईल. यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, या वर्षी महापूजेसाठी पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर-पांगूळ या गावातील विठ्ठल ज्ञानदेव बडे आणि त्यांच्या पत्नी यांना ‘मानाचे वारकरी’ म्हणून मान मिळाला आहे.

























































