पंढरपुरात कोरोना रुग्णांच्या बिलांची तपासणी, मनमानी बिले आकारणाऱया रुग्णालयांना दणका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठय़ा प्रमाणात वाढत असल्याने रुग्णांना तत्काळ उपचार मिळावेत, यासाठी तालुक्यात शहर व ग्रामीणमध्ये 14 खासगी रुग्णालयांना प्रशासनाने कोविड हॉस्पिटल चालविण्यास परवानगी दिली आहे. या हॉस्पिटलमधून मिळणाऱया बिलाबाबत अनेक तक्रारी येत आहेत. या तक्रारींची दखल घेऊन रुग्णालयांमध्ये आकरण्यात येणाऱया 339 बिलांची 6 पथकांमार्फत तपासणी करण्यात आली. यात अवाच्या सवा बिल आकारणी करणाऱया हॉस्पिटलला तंबी देत त्यांच्या बिलातील 4 लाख 82 हजार रुपये कमी करण्यात आले आहेत.

पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. तालुक्यात 14 खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जातात. खासगी रुग्णालयांकडून आकारण्यात येणाऱया बिलांचे शासननिर्णयानुसार लेखापरीक्षण करण्यात येत आहे. खासगी रुग्णालयांमधील बिलांची तपासणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्या नेत्वृवाखाली 6 पथकांनी 339 बिलांची तपासणी केली. या टीममध्ये उपकोषागार अधिकारी संजय सदावर्ते, सहायक निबंधक एस. एम. तांदळे हेदेखील कार्यरत आहेत.

पंढरपूर शहरामधील गॅलक्सी, लाइफलाइन, श्री गणपती, जनकल्याण, ऍपेक्स, श्री विठ्ठल, पावले, वरदविनायक, मेडीसिटी, ऑक्सिजन पोलीस, पडळकर, विठ्ठल, डीव्हीपी तसेच करकंब येथील जगताप हॉस्पिटल या खासगी 14 खासगी रुग्णालयांत कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णालयांतील बिले पथकांनी तपासली असून, जादा बिले आकरण्यात आल्याने तब्बल 4 लाख 82 हजार 200 रुपये कमी करण्यात आले आहेत. यापुढील काळातही नियमितपणे बिले तपासली जाणार आहेत. अतिरिक्त रक्कम आढळून आल्यास ती कमी करण्यात येणार असल्याचे पथकाने सांगितले आहे.

या संबंधित हॉस्पिटलमधील बिलांबाबत रुग्णांना साशंकता असेल त्यांनी बिल अदा करण्यापूर्वी प्रांत कार्यालय, पंढरपूर येथील नियंत्रण कक्षात संपर्क साधावा तसेच बिलांबाबत लिखित स्वरूपात तक्रारी दाखल कराव्यात.

– सचिन ढोले, प्रांताधिकारी.