Pandharpur news – विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या 3 महिला चंद्रभागेत बुडाल्या; दोघींचे मृतदेह सापडले, तिसरीचा शोध सुरू

जालना जिल्ह्यातील भोकरदन येथून विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूर येथे आलेल्या महिला चंद्रभागा नदीत बुडाल्या. यापैकी दोन महिलांचे मृतदेह सापडले असून तिसरीचा शोध सुरू आहे. सुनीता सपकाळ (वय – 43) आणि संगीता सपकाळ (वय – 40) अशी दोन महिलांची नावे आहेत, तर तिसऱ्या महिलेची ओळख समोर आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठल दर्शनापूर्वी चंद्रभागेत स्नान करण्याची प्रथा आहे. त्याप्रमाणे तीन महिला भाविक सकाळी सातच्या सुमारास चंद्रभागेत उतरल्या. पंडलिक मंदिराजवळ स्नान करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने या महिला बुडाल्या. सोबत असलेल्या महिलांना आरोडाओरडा करत मदतीसाठी आवाज दिला. मात्र पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे तिन्ही महिला बुडाल्या.

दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन आणि स्थानिक कोळी बांधवांनी चंद्रभागेच्या पात्रामध्ये बुडालेल्या महिलांची शोधमोहीम सुरू केली. आतापर्यंत दोन महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून तिसऱ्या महिलेचा शोध सुरू असल्याचे कळते.