
आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला गेलेल्या वारकऱयांचे परतीच्या प्रवासात प्रचंड हाल झाले. रेल्वेने भाविकांसाठी पंढरपूर ते नागपूरदरम्यान सोडलेल्या विशेष ट्रेनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी चढल्याने वारकऱयांची घुसमट झाली.
विठुरायाची मनोभावे पूजा करून आपल्या गावाकडे निघालेल्या वयोवृद्ध वारकऱयांना मनस्ताप सहन करावा लागला. पंढरपूरहून नागपूरला जाणाऱया रेल्वेत झालेल्या प्रचंड गर्दीमुळे आरक्षण असतानाही अनेक प्रवाशांना कोंडमारा सहन करत नागपूर गाठावे लागले. महिला वारकऱयांचे तर सर्वाधिक हाल झाले.
एका कोचमध्ये 300 पेक्षा अधिक प्रवासी
रेल्वेच्या एका कोचमध्ये 80 प्रवाशांची आसन व्यवस्था असताना 300 पेक्षा अधिक प्रवासी चढले. रेल्वे प्रशासनाकडे याची तक्रार करूनदेखील काहीच उपाययोजना करण्यात आली नसल्याची तक्रार वारकऱयांनी केली आहे. यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत.
16 तासांचा प्रवास
पंढरपूर ते नागपूर प्रवासासाठी 580 रुपयांचे तिकीट काढून आरक्षण करण्यात आले. कन्फर्म तिकीट मिळूनही कोंडमारा सहन करत 16 तासांचा प्रवास वारकऱयांना सहन करावा लागला.
शिंदे-फडणवीस सरकार फक्त घोषणा करते, पण सुविधा देत नाही
शिंदे-फडणवीस सरकार फक्त घोषणा करते, पण वारकऱयांना सुविधा देत नाही. पंढरपूरला जाणाऱया भाविकांसाठी सरकार आणि रेल्वे प्रशासनाने आवश्यक त्या सुविधा कशा मिळतील याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे वारकऱयांनी म्हटले आहे.




























































