
सामना प्रतिनिधी । पंढरपूर
राज्याच्या विविध भागातून दररोज मोठ्या प्रमाणात भाविक श्री.विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येतात. तसेच यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. येणाऱ्या भाविकांना विठ्ठल मंदिरा बाबत तसेच शहरातील आवश्यक ठिकाणाची माहिती तात्काळ मिळावी यासाठी पोलीस प्रशासनामार्फत तीर्थक्षेत्र पोलीसींग संकल्पना राबविण्यात आली आहे. असे जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.
तीर्थक्षेत्र पोलीसिंग कक्षाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील व प्रांतधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे, पोलीस निरिक्षक राजेश गवळी, पोलीस निरिक्षक श्री.खारतोडे, मंदीर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, स्वेरी कॉलजचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील म्हणाले की, “श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपूर येथे येतात. येणाऱ्या भाविकांबरोबरच शहरातील नागरिकांची सुरक्षितेतची जबाबदारी पोलीस प्रशासनावर आहे. यात्राकालावधीत वाहतुक व्यवस्थेवर व सुरक्षेवर अधिक वेळ वाया जातो. त्यामुळे येणाऱ्या भाविकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी भाविकांच्या मदतीसाठी तीर्थक्षेत्र पोलींसींग केंद्र माहिती व सेवेसाठी सुरु करण्यात आले आहे. हे केंद्र शहरातील अंबाबाई पटांगण, नवीन एस.टी. बसस्थानक, शिवाजी चौक व सांगोला चौक येथे सुरु करण्यात आली आहेत.” या केंद्रामधून विठ्ठल मंदिरासह शहरातील मठ, धर्मशाळा, आरोग्यसेवा तसेच महत्वाच्या ठिकाणची माहिती दिली जाणार असल्याचेही जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.
भाविकांना आवश्यक असणारी सर्व माहिती या केंद्रामध्ये मिळणार आहे. तसेच स्थानिक नागरिकांनी या संकल्पनेला सहकार्य करावे असे आवाहनही उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कवडे यांनी केले. यावेळी मान्यवर नागरिक, पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



























































