
>> सुनील उंबरे
दिल्ली येथील ज्येष्ठ साहित्यिक, प्राध्यापक मधुकर गोपाळ भगत पंढरपूर मध्ये भिकारी अवस्थेत आढळून आले. सदरची बातमी आज सकाळी दैनिक ‘सामना’च्या ऑनलाइन मधून प्रसिद्ध होताच भगत यांच्या मुलाने सामना प्रतिनिधीला संपर्क करुन वडिलांची विचारपूस केली. प्रा. भगत हे गेल्या महिन्याभरापासून दिल्लीतील राहत्या घरातून बेपत्ता झाले होते. बरीच शोधाशोध करुन देखील त्यांचा संपर्क होत नसल्याने कुटूंब हताश होते. दरम्यान प्रा. भगत यांच्यावर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून संबंधित डॉक्टरांशी चर्चा करुन वडिलांना दिल्लीला घेऊन जाणार असल्याचे प्रा. भगत यांच्या मुलाने प्रतिनिधीला सांगितले. प्रा. भगत यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे.
या बाबतचे ह्दयद्रावक वृत्त असे की, काल बुधवार दि. 9 मार्च रोजी प्रा. भगत हे रेल्वे स्टेशन समोरील भक्ती मार्गावर विपन्न अवस्थेत आढळून आले. त्यांच्या पायाला जखम असल्याने ते वैद्यकीय उपचार करण्यासाठी येण्या जाणाऱ्या लोकांकडे मदत मागत होते. अतिशय वाईट अवस्थेत असल्याने भगत यांच्याकडे कोणी पहात ही नव्हते आणि मदत ही करीत नव्हते. तथापि काही नागरिकांनी ही खबर रॉबिनहुड आर्मी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला दिली. या शाखेत काम करणारे योगेश कुलकर्णी व सुजित दिवाण यांनी तातडीने दखल घेत प्रा. भगत यांना 108 रुग्ण वाहिकेतून सोलापूरला हलविले.
सोलापूरला हलवीत असताना कुलकर्णी व दिवाण यांचा जो प्रा. भगत यांच्याशी संवाद झाला तो अचंबीत करणारा होता. प्रा. भगत या दोघांशी अस्सल इंग्रजी मधून बोलत होते त्यांनी साहित्यिक असल्याचे व अनेक पुस्तकांचे लिखाण केल्याचे सांगितले. मला खूप शारीरिक वेदना होत आहेत मला तातडीने रुग्णालयात घेऊन चला माझ्यावर उपचार करा अशी विनंती त्यांनी केली. प्रा. भगत यांनी दिलेली माहिती खरी आहे का हे तपासण्यासाठी या तरुणांनी गुगल वर सर्च केले असता हेच ते भगत असल्याचे पाहून दोघांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी तातडीने प्रा.भगत यांना सोलापूरला हलविले.सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत त्यांची तब्येत स्थिर आहे.
ही बातमी दैनिक सामनाने आज प्रसिद्ध केली ती राज्यभर व्हायरल झाली. बातमीत ते वर्धा येथील असल्याचा उल्लेख केल्याने पोलिसांकडून चौकशीची चक्रे फिरली. चौकशी अंती हे कुटूंब दिल्लीत राहात असल्याचे समोर आले. दिल्लीतील मुलांकडे संपर्क केला असता त्यांनी वडील एक महिन्यापासून घरातून बेपत्ता झाल्याचे सांगितले. धम्म दीक्षा घेण्यासाठी म्हणून बाहेर पडले त्यानंतर संपर्कच झाला नाही. आज दैनिक सामनाच्या बातमीतून वडील पंढरपूर मध्ये असल्याचे समजले. बातमी वाचून आनंद आणि खूप वाईट वाटले. संबंधित डॉक्टरांशी संपर्क करुन त्यांना पुढील उपचारासाठी दिल्ली किंवा नागपूर येथे हलविणार असल्याचे मुलाने सांगितले.
मुलाने बातमीत नाव न छापण्याची विनंती केली आहे. प्रा. भगत यांची चारही मुले उच्च शिक्षित व वरिष्ठ पदावर काम करतात. वडील विपन्न अवस्थेत सापडले असले तरी सुरक्षित असल्याचे ऐकून त्यांना भरुन आले. दैनिक सामनाच्या बातमीमुळे वडिलांचा शोध लागला म्हणून त्यांनी सामनाचे आभार व्यक्त केले. दरम्यान प्रा. भगत यांच्या नातेवाईकांनी सोलापूर येथील डॉक्टरांशी संपर्क करीत मोबाईल वरुन संवाद साधला असता दोघांनाही अश्रू अनावर झाले.
प्रा. भगत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांशी इंग्रजी मधून असा संवाद साधायचे “Will you please arrange me 50 rupees? I will pay back. मला एक टॉवेल खरेदी करायचा आहे की जेणेकरून मी आंघोळ करू शकेल…
प्रा. भगत यांची ओळख…
भगत हे मिनिस्टर ऑफ एज्युकेशन या विभागात क्लास वन ऑफिसर म्हणून काम पहात होते त्यांना पावणेदोन लाख पगार होता. निवृत्ती नंतर त्यांना पन्नास हजार पेन्शन आहे. त्यांची सात पुस्तके अभ्यासक्रमात आहेत. अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. गुगलवर त्यांची सर्वती माहिती उपलब्ध आहे.
जोशींची अशीही माणुसकी…
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे तत्कालीन कार्यकारी अधिकारी सुनील जोशी यांच्या वाचनात दैनिक सामनाची बातमी आली. जोशी यांनी अनेक वर्षे विदर्भात काम केलेले असल्याने विदर्भातील अनेक पोलीस अधिकारी त्यांचे मित्र आहेत त्यांनी सामनाची बातमी वर्धाचे डीवायएसपी सुनील साळुंखे यांनी पाठविली आणि चौकशी करण्याची विनंती केली. साळुंखे यांनी तत्पर सूत्रे हलवीत प्रा. भगत यांच्या मुलाचा माग काढला. त्यांच्या पर्यंत सामनाची बातमी पोहचविली असता त्यांनी माझेच वडील असल्याचे मान्य केले. जोशींनी प्रसंगावधान दाखविले नसते तर कदाचित प्रा भगत पिता पुत्राची भेट व्हायला आणखी काही अवधी लागला असता.



























































