पंढरपूर – दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा ट्रक चंद्रभागेत कोसळला

देव दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा ट्रक जुन्या दगडी पुलावरून चंद्रभागेच्या वाळवंटात कोसळला. ट्रकमधून आलेले भाविक श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाला गेल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या घटनेबाबत पोलीस ठाण्यात कोणतीच नोंद करण्यात आली नाही हे विशेष.

एम.एच. 12 आय.ऐ.- 9312 या क्रमांकाच्या ट्रकमधून बिदर येथील 25 हून अधिक भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीत आले होते. हे भाविक चंद्रभागेच्या पैलतीरावर उतरून विठुरायाच्या दर्शनासाठी गेले असल्याने रिकामा ट्रक घेऊन चालक जुन्या दगडी पुलावरून जात असताना मद्यपान केल्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि तो थेट वाळवंटात पडला. सुदैवाने यामध्ये कोणीही नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही.

सध्या उजनी धरणातून चंद्रभागेत मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला असून नदी दुथडी भरून वाहत आहे. मात्र हा ट्रक पात्रात न पडता जवळील वाळूमध्ये पडला. तसेच यामध्ये भाविक ही नव्हते. यामुळे ट्रकवर लिहलेल्या ‘पांडुरंग कृपा’ या अद्याक्षराची भाविकांना प्रचिती आली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नगरपरिषदेच्या आरोग्य समितीचे सभापती विक्रम शिरसट यांनी कार्यकर्त्यांसह येथे धाव घेऊन घटनेची माहिती घेतली व भाविकांना दिलासा दिला.

आपली प्रतिक्रिया द्या