श्री विठ्ठल, रखुमाईच्या मूर्तीवर वज्रलेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पदस्पर्श दर्शन, महापूजा आदी कारणांनी झीज झालेल्या श्री विठ्ठल-रुखुमाईच्या मूर्तीचे संरक्षण करण्यासाठी पुरातत्त्व विभागाकडून दोन दिवस मूर्तीवर रासायनिक लेपन केले जाणार आहे. यासाठी श्रींच्या मूर्तीची स्वच्छता करण्यात आली असून, आज वज्रलेप करण्यात येणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

यापूर्वी 1988, 2005 आणि 2012 मध्ये पुरातत्त्व विभागाकडून मूर्तींवर वज्रलेप प्रक्रिया करण्यात आली होती.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य तसेच सल्लागार समितीचे सदस्य प्रसाद महाराज अमळनेरकर, चैतन्य महाराज देगलूरकर, विठ्ठलदादा वासकर, माधव महाराज शिवणीकर, समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांची बैठक झाली, यात एकमताने निर्णय झाला. बैठकीनंतर पुरातत्त्वच्या अधिकाऱयांनी सोवळे नेसून कामाला सुरुवात केली. पुरातत्त्व विभागाचे उपअधीक्षक श्रीकांत मिश्रा व त्यांचे चार सहकारी लेपन प्रक्रियेचे काम करीत आहेत. पुरातत्त्वच्या सूचनेनुसार रासायनिक प्रक्रिया केली जात आहे. यामध्ये मूर्तीवर लेपन केले जाते. चार-पाच वर्षांनंतर हा लेप झिजल्यावर पुरातत्त्वच्या अधिकाऱयांकडून पाहणी करून पुन्हा ही प्रक्रिया करावी लागते.