सुखकर वारीसाठी गर्दीवर नियंत्रण हवेच!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुनील उंबरे, पंढरपूर

पंढरीच्या वारीत सहभागी व्हायचे असेल तर पालखी आणि दिंडीच्या सोहळेकरांना यंदा शासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. कोरोनाच्या जीवघेण्या रोगापासून वारकऱ्यांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचे वारकरी संप्रदायातून स्वागत होत आहे. तथापि यापुढील काळात पंढरीची वारी अधिक सुखावह होण्यासाठी मानाच्या पालख्यांचे सोहळा प्रमुख, मंदिराचे विश्वस्त, संस्थानचे अध्यक्ष, प्रमुख महाराज मंडळीनी गर्दीवर निर्बंध आणण्यासाठी कठोर पावलं उचलने काळाची गरज आहे.

येत्या 1 जुलै रोजी पंढरपूरच्या आषाढी वारीचा सोहळा आहे सध्याची कोरोना विषाणूची गडद छाया लक्षात घेता हा सोहळा होणार की नाही झाला तर कशा पद्धतीने होईल या बाबत अध्यापही धोरण ठरलेले नाही. वारीला आणखी 45 दिवस अवधी आहे. भविष्यातील कोरोनाची वाटचाल पाहून त्यावर निर्णय घेऊ, अशी भूमिका शासनाने घेतलेली आहे. आषाढी वारीला 12 ते 15 लाख आणि कार्तिकी वारीला 5 ते 7 लाख वारकरी भाविकांची गर्दी असते. पंढरपूर शहराचे क्षेत्रफळ हे चार किलोमीटरच्या परिघात आहे. अतिशय लहान असलेल्या या मोठ्या खेड्याची लोकसंख्या दीड लाख इतकी आहे. इथे लाखोंची गर्दी विसावल्यानंतर या गावची अवस्था कशी होत असेल हे भाष्य न करता देखील तुम्ही समजून जाल.

श्री विठ्ठलाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीतील वारीला शेकडो वर्षाची परंपरा आहे आणि वारी पोहोचती करण्यासाठी केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर विविध राज्यातील आबालवृद्ध वारकरी भाविक शेकडो मैलाचा पायी प्रवास करून श्री विठुरायाच्या नगरीत हजेरी लावत्तात. पंढरीत आल्यानंतर त्यांना ओढ असते चंद्रभागेचे स्नान, सावळ्या विठ्ठलाचे दर्शन आणि नगरप्रदक्षिणेचे. तीन चार आठवड्याचा प्रवास करून आल्यानंतर किमान या गोष्टी सुखासुखी व्हायला हव्यात मात्र दुर्दैवाने तसे घडत नाही. देवाचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी थकून भागून आलेल्या या वारकऱ्यांना दर्शन रांगेत 25 ते 35 तास तिष्ठत उभे राहावे लागते.

एवढा वेळ उभा राहून देखील देवाचे श्रीमुख डोळेभरून पाहता येईल आणि पायावर डोके टेकवायला मिळेलच असे नाही. कारण वारीच्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी एक मिनिटांमध्ये 45 ते 50 भाविकांना दर्शन देण्याची घाई केली जाते. या गडबडीत देवाच्या पायाला नशिबानेच हात लागला तर लागला नाहीतर पुढे अशी अवस्था असते. वारी पोहोचती करण्यासाठी एवढा आटापिटा करून देवाचे दर्शन तर समाधाकारक होतच नाही .त्याला कारण म्हणजे आवाक्याबाहेरची गर्दी. दर्शनासारखीच अवस्था चंद्रभागेच्या स्नानाला गेल्यानंतर होते. दीड ते दोन लाख लोक संख्या लक्षात घेवून टाकण्यात आलेली शहराची ड्रीनेज व्यवस्था 12 ते 15 लाख भाविक आल्यानंतर ओव्हरफ्लो होते. आणि हेच ड्रीनेजचे मलमिश्रित घाण पाणी चंद्रभागेत जावून मिसळते.

चंद्रभागेच्या स्नानासाठी मोठ्या श्रद्धेने आलेल्या वारकरी भाविकाला माहितच नसते की आपण गटाराच्या दुर्गंधीयुक्त घाण पाण्यात स्नान करीत आहोत. चंद्रभागेत मिसळणारे हे घाण पाणी अन्यत्र वळविण्यासाठी स्थानिक प्रशासकीय यंत्रणेचे प्रयन्त सुरु आहेत त्यात काही अंशी यश आले असले तरी आजही अनेक घाटावरून ड्रीनेजचे पाणी पात्रात मिसळले जात आहे.

देवाचे दर्शन आणि चंद्रभागा नदीतील अनुभव पाहता देवाची नगरप्रदक्षिणा तरी सुखासुखी व्हायला हवी पण एकादशीच्या पर्वणीला या मार्गावर वारकऱ्यांची एवढी गर्दी असते की मुंगीलाही जायला वाट शोधावी लागते. महाद्वार घाट, महाद्वार चौक, कालिकादेवी चौक, चौफाळा आणि मंदिर परिसरात एवढी रेटारेटी, चेंगराचेंगरी असते की चालताना जीव मुठीत धरावा लागतो.

कोरोनाच्या निमित्ताने शासनाने पालखी सोहळा व दिंडी सोहळ्यावर परवानगी घेण्याचे निर्बध घातले आहेत. हे निर्बध या वारी पुरते मर्यादित आहेत पण अशा प्रकारे काही निर्णय घेवून नव्याने सहभागी होणाऱ्या पालखी आणि दिंडी सोहळ्यांना वारकरी संप्रदयानेच निर्बंध लावले तर भविष्यातील पंढरीची वारी ही वारकरी भाविकांना, पालखी मार्गावरील गावकऱ्यांना, पंढरपूरकरांना आणि प्रशासनाला अधिक सुसह्य होईल त्यासाठी सकारात्मक प्रयत्न व्हायला हवेत.

काळाची गरज
पंढरपूर मधील वाढती गर्दी लक्षात घेता या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयन्त व्हायला हवेत आठ दहा वर्षापूर्वी या विषयाच्या अनुषंगाने पालखी सोहळ्यात हा विषय मांडला होता मात्र फारसा कोणी प्रतिसाद दिला नाही पण ही काळाची गरज आहे यासाठी नव्याने येणाऱ्या पालख्या आणि दिंड्यांना संस्थानने काही काळ नंबर देवू नयेत अशी भूमिका घ्यायला हवी कोरोना झाला की यावर पुन्हा चर्चा घडवून आणू.
– हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर
अध्यक्ष,
वारकरी फडकरी दिंडीकरी समाज संघटना

पंढरपूरकरांचा विचार व्हायला हवा
वारीच्या सोहळ्यात सुमारे 600 पालख्या सहभागी होतात त्यापैकी प्रमुख असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन पालखी सोहळ्यातच पाच लाखाहून अधिक वारकरी सहभागी होतात. दरवर्षी नवनवे पालखी सोहळे वारीच्या मार्गावर सहभागी होत आहेत. पंढरपूरची व्याप्ती लक्षात घेता सध्या जमणारी गर्दी ही प्रचंड आहे नियोजनापेक्षा अधिक संख्येने लोक येत असल्याने वारी काळात मुलभूत सेवासुविधाचा अभाव असतो त्याचा त्रास हा वारकर्यांना आणि स्थानिक नागरिकांना सहन करावा लागतो. त्यामुळे गर्दीचे विकेंद्रीकरण करण्यासाठी पंढरपूर मध्ये 65 एकर आणि तुळशी वृंदावन सारखे प्रकल्प हाती घेणे गरजेचे आहे.
– हभप राणा महाराज वासकर,
अध्यक्ष,
वारकरी पाईक संघ