अखेरचा ‘जय हो’… पंडित जसराज अनंतात विलीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोणत्याही मैफलीच्या सुरुवातीला श्रोत्यांकडे बघत हात उंचावून ‘जय हो’ म्हणणारे आणि त्यानंतर स्वरांचा अखंड कृपाप्रसाद देणारे ‘संगीत मार्तंड’ पंडित जसराज यांना त्यांच्या शिष्यगणांनी आणि चाहत्यांनी आज अखेरचा ‘जय हो’ केला. ‘जय हो बापूजी’चा घोष, ‘ओम नमः शिवाय’च्या अखंड प्रार्थनेचे सूर,  शिष्यांनी वाहिलेला स्वरांजली आणि जोडीला आकाशातून बरसणार्‍या जलधारा… अत्यंत भावपूर्ण वातावरणात पंडिज जसराज यांना अखेरचा निरोप देण्यात आला. विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या चाहत्यांना शोक अनावर झाला.

पंडित जसराज यांचे 17 ऑगस्ट रोजी अमेरिकेतील न्यू जर्सी येथे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. पंडित जसराज यांचे पार्थिव बुधवारी मुंबईत आणण्यात आले. अंधेरी येथील वर्साेवा परिसरातील त्यांच्या निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. गुरुवारी सकाळपासूनच पंडितजींच्या अनेक शिष्यांनी, आप्तेष्टांनी, संगीतप्रेमींनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. यामध्ये पंडित शिवकुमार शर्मा, ज्येष्ठ गायक अनुप जलोटा, पंडित रोणु मुजुमदार, ललित पंडित, कैलास खेर, श्रेया घोषाल, संजय लीला भंसाली आदींचा समावेश होता. पंडित जसराज यांच्या शिष्यांनी आपल्या गुरुंना स्वरांतून मानवंदना दिली. पंडित जसराज यांचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळण्यात आले. पोलीस बँडच्या साथीने आणि नंतर स्मशानभूमीत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.