पांडुरंगाच्या पालखीचे थोरल्या पादुका मंदिरात स्वागत, सोहळ्याचा पहिला मुक्काम हरिनाम गजरात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीक्षेत्र पंढरपूर येथील पांडुरंगाच्या पालखी सोहळ्याचे वडमुखवाडीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टच्या वतीने रांगोळीच्या पायघड्या, पुष्प सजावटीसह हरिनाम गजरात पंढरीकडे पहिल्या मुक्कामात जल्लोषात स्वागत करण्यात आले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अॅड. विष्णू तापकीर यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत आणि पाहुणचार केला.

यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे विश्वस्त माऊली जळगावकर महाराज, श्री पांडुरंगराय पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. नामदेव महाराज वासकर, प्रभू महाराज वासकर, पुजारी संदीप कुलकर्णी, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त अँड विकास ढगे पाटील, माऊलींच्या पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, दिघी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, पुणे बार असोशिएशनचे अध्यक्ष अॅड. पांडुरंग थोरवे, पिंपरी-चिंचवड बार असोशिएशनचे अध्यक्ष अॅड. नारायण रसाळ यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा सत्कार संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अॅड. विष्णू तापकीर यांचे हस्ते शाल, श्रीफळ, उपरणे देऊन करण्यात आला. यावेळी श्रींच्या पादुकांची पूजा त्यांच्या हस्ते करण्यात आली.

पंढरपूर ते आळंदी श्रींचा पादुका पालखी सोहळा गेल्या 12 वर्षांपासून येत आहे. आळंदी ते पंढरपूर पांडुरंगाचा पादुका पालखी सोहळा हरिनाम गजरात परतीच्या प्रवासात पायी जाताना मुक्कामी होता. दिंडीतील भाविक, वारकरी, दिंडेकरी, टाळकरी, विणेकरी पालखी मुक्कामी थोरल्या पादुका मंदिरात विसावले. यावेळी परिसरातील नागरिक, भाविक यांनी श्रींच्या पादुकांचे दर्शन घेतले. पादुकांना पुष्पहार, तुळशीहार, श्रीफळ अर्पण करण्यात आले. श्रींची समाज आरती हरिनाम गजरात झाली. त्यानंतर श्रींना महानैवेद्य दाखवण्यात आला. यावेळी भाविक व वारकरी यांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. अनुष्का केदार हिने लक्षवेधी रांगोळी रेखाटली. श्रींचे पादुका पालखी सोहळा पुढील प्रवासास हरिनाम गजरात भल्या पहाटे आज मार्गस्थ झाला. यावेळी खजिनदार दत्तात्रय गायकवाड, रमेश महाराज घोंगडे, राजेंद्र नाणेकर, काशिनाथ तापकीर, मनोहर भोसले, नंदकुमार वडगावकर, ज्ञानेश्वर घुंडरे, ज्ञानेश्वर गुळुंजकर उपस्थित होते.