
वैरण आणण्यासाठी शेतात जाताना गव्याने केलेल्या हल्ल्यात शेतकऱयाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे येथे घडली. गावात घुसलेल्या गव्याला हुसकावून लावताना हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहितीही समोर आली आहे. माणिक बळवंत पाटील (वय 48) असे मृत शेतकऱयाचे नाव आहे.
गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापूर शहरासह जिह्यात गव्यांचा मानवी वस्तीत प्रचंड वावर वाढला आहे. कोल्हापूर जिह्यातील पन्हाळा तसेच शाहूवाडी या दुर्गम भागातील गावांमध्ये गव्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. शाहूवाडी तालुक्यात उदगिरीपैकी केदारलिंगवाडीमधील गव्याच्या हल्ल्यात शेतकरी बंडू बाबू फिरंगे (वय 65) हे गंभीर जखमी झाल्याची घटना काल घडली होती, तर आज पन्हाळा तालुक्यात गव्याच्या हल्ल्यात शेतकऱयाचा मृत्यू झाला. आज दुपारी दोनच्या सुमारास शेतात जनावरांना वैरण आणण्यासाठी जाताना मक्याच्या शेतात असलेल्या गव्याने माणिक पाटील यांच्यावर हल्ला केला. छातीत शिंग घुसल्याने ते जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच शेतकऱयांनी त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मूत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱयांनी सांगितले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.
































































