
दोन गव्यांच्या झुंजीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव व पोहाळे तर्फ बोरगाव गावांच्या हद्दीवर घडली. या झुंजीत पाच गुंठे क्षेत्रातील ऊसपिकाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, याच तालुक्यात दुसऱया घटनेत वाघवे गावात गव्याच्या हल्ल्यात एका घोडय़ाचा मृत्यू झाल्याची घटनाही समोर आली आहे.
शेतकरी आनंदा पाटील यांच्या उसाच्या शेतात पहाटे चारच्या सुमारास गव्यांची झुंज सुरू झाली. त्यांच्या उसाच्या शेताचे नुकसान करत हे गवे तानाजी पाटील यांच्या शेतात पोहोचले. झुंजीत त्या ठिकाणच्या सुमारे पाच गुंठय़ातील उसाच्या पिकाची नासधूस झाली. सकाळी शेतीकामासाठी आलेल्या शेतकऱयांकडून माहिती मिळताच, वनपाल नाथा पाटील, वनरक्षक कुंडलिक कांबळे, महादेव कुंभार, संगीता देसाई, वनमजूर बाळू म्हामुलकर, नाथा पाटील आदी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पाहणीत गव्यांच्या अंगावर शिंग लागल्याच्या खुणा आढळल्या. सुमारे आठ ते नऊ वर्षांची पूर्ण वाढ झालेला हा गवा झुंजीत मृत्युमुखी पडल्याचे त्यांनी सांगितले. मुख्य रस्त्यापासून दोनशे मीटर अंतरावर उसात असणाऱया या मृत्युमुखी पडलेल्या गव्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी झाली होती. पशुवैद्यकीय अधिकारी रोहित रानभरे यांनी मृत गव्याची तपासणी केली.




























































