
माझ्या घरात कोणताही पूर आला नाही. माझं घर वाहून गेलं नाही. मी कुठेही आश्रित होण्याचा अर्ज करत नाहीये. मग माझं पुनर्वसन कोणी कशाला करेल? कसलं पुनर्वसन, मी काही प्रकल्पग्रस्त नाही, असं सांगत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद मिळालं नसल्याने नाराज नसल्याचं स्पष्ट केलं.
केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत यासंदर्भात मौन सोडलं. मंत्रीपद मिळालं नाही म्हणून नाराज असण्याचा पिंवा राजकीय पुनर्वसनाचा प्रश्न आपल्यासाठी गैरलागू असल्याचं सांगितलं. पुनर्वसन हा शब्दच मला मान्य नाही. पुनर्वसन कोणाचं केलं जातं, जो बरबाद झालाय. ज्याचं सगळं वाहून गेलंय. माझ्याबाबतीत तसं काहीही झालेलं नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
गोपीनाथ मुंडे यांचा अनेक राजकीय कार्यकर्त्यांवर प्रभाव आहे. मुंडे कुटुंबावर प्रेम आहे. त्यामुळं समर्थकांमध्ये नाराजीची भावना असेल हे मी नाकारू शकत नाही. मात्र, माझ्या मनात किंवा कुटुंबामध्ये तशी कुठलीही नकारात्मक भावना नाही. भाजपामध्ये एक पद्धत आहे, त्याचप्रमाणे निर्णय घेतले जातात. फक्त प्रीतम मुंडे नाही, तर हीना गावित यांचंही नाव चर्चेत होतं. पण ती खरी ठरली नाहीत, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.
मुंडेंना पर्याय म्हणून कराडांना पुढे केलं जातं का, असं विचारण्यात आलं असता पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘मी राजकारणात व्यवसाय म्हणून आले नाही. मी व्रत म्हणून आले आहे. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर बिखरलेल्या संतप्त समाजाला एका ठिकाणी आणणं माझ्यासाठी आव्हान होतं. गोपीनाथ मुंडेंनी बसवलेली घडी विस्कटू नये ही माझी जबाबदारी आहे. मी वंजारी समाजाबरोबरच राज्यातील नेता आहे. वंजारी समाजातील नेता मोठा होत असेल तर मी त्यांच्या पाठीशी उभी आहे.
नव्या लोकांमुळं एक मत वाढलं तर स्वागत
नव्या लोकांना संधी देण्यास काही हरकत नाही. त्यांच्यात काही गुण असू शकतात, जे पक्षासाठी भविष्यात फायद्याचे ठरू शकतात. बाहेरून आलेल्या लोकांमुळं पक्षाला फायदा होतोय असं पक्षाला वाटत असेल. तसा पक्षातील नेत्यांचा अनुभव असेल. तसं असेल तर चांगलं आहे. पक्षामध्ये जे नवीन आलेत त्यांचंही स्वागत आहे. ज्यांना मंत्रीपद मिळालंय त्यांचंही स्वागत आहे आणि या नव्या लोकांमुळं भाजपचं एक मतही वाढत असेल तर त्याचंही स्वागत असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.
भाजपला टीम नरेंद्र, टीम देवेंद्र मान्य नाही
टीम देवेंद्रमध्ये कोण आणि टीम नरेंद्रमध्ये कोण हे मला माहीत नाही, पण हे भाजपाला मान्य नाही. भाजपाला देश प्रथम, नंतर पक्ष आणि नंतर मी. भाजपात ‘मी’पणा मान्यच नाही. आपण, आम्ही असं म्हणणं मान्य आहे. त्यामुळे अशी कोणती टीम असणं पक्षाला मान्य असेल असं वाटत नाही. मी भाजपाच्या संस्कृतीचा सन्मान करणारी कार्यकर्ता आहे. पक्षनिष्ठा माझ्या वडिलांनी मला संस्कारात दिली असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.
बाहेरून आलेल्या लोकांमुळं पक्षाला फायदा होतोय असं पक्षाला वाटत असेल. तसा पक्षातील नेत्यांचा अनुभव असेल. तसं असेल तर चांगलं आहे.

























































