
राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांची पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांनी वरळी येथील राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी डॉ. गौरी यांचे पती अनंत गर्जे यांना अटक करण्यात आली. रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास अनंत गर्जे यांनी वरळी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली असून सोमवारी सकाळी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
डॉ. गौरी या केईएम रुग्णालयातील दंत विभागात डॉक्टर म्हणून कामाला होत्या. अनंत यांच्याशी फेब्रुवारी महिन्यात त्यांचे लग्न झाले होते. डॉ. गौरी आणि अनंत यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. नेमका कोणता वाद होता हे स्पष्ट झालेले नाही. याच वादातून डॉ. गौरी यांनी शनिवारी वरळी येथील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
हा प्रकार गर्जे यांच्या लक्षात आला. त्यानंतर अनंत हे घरी आले. त्यांनी गौरीला खाली उतरवून नायर रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याची माहिती समजताच डॉ. गौरी याच्या कुटुंबीयांनी वरळी पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरळी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.
तिघांवर गुन्हा दाखल
दरम्यान, वरळी पोलिसांनी वरळी पोलिसांनी गौरी गर्जे आत्महत्येप्रकरणी रविवारी भादवि कलम 108, 85, 352 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. अनंत गर्जे, त्यांची बहीण शीतल गर्जे- आंधळे आणि दीर अजय गर्जे यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर मध्यरात्री एक वाजता अनंत गर्जे पोलिसांना शरण आला.



























































